पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यावरुन झालेल्या आरोपांबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या बाजूला तन्मय फडणवीस याने सोशल मीडियावर शेअर केलेले लस घेतानाचे फोटो डिलीट केले आहेत. तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कोरोना लस घेण्यासाठी काही नियम आहेत. यापैकी कोणत्या नियमांच्या निकषांनुसार तन्मय फडणीस यांनी कोरोना लस घेतली असा सवाल विचारत काँग्रसने देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले होते.
दरम्यान, तन्मय फडणवीस याने कोरोना लस घेतानाचे फोटो शेअर केल्यावरुन होणाऱ्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, होय, तन्मय माझा दुरचा नातेवाईक आहे. कोरोना लस घेण्याचे नियम सर्वांना सारखे आहेत. जर त्याने निकशात बसत असल्यास लस घेतली असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. जर नियमात बसत नसताना लस घेतली असेल तर ते चुकीचे आहे. त्याने कोणत्या निकषानुसार लस घेतली याबाबत मला कल्पना नाही. (हेही वाचा, Maharashtra: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)
काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले आहे की, ''45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!'' याशिवाय ''फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी?'', असे सवालदेखील काँग्रेसने उपस्थित केले होते.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय फडणवीस हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आणि आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे. तो नात्याने देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या लागतो. शोभा फडणवीस या विधान परिषद आमदार आणि माजी मंत्रीही राहिल्या आहेत.