
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत व त्यातीलच एक गोष्ट म्हणजे लग्न. आता लॉकडाऊनच्या काळात तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) घडलेल्या एका लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कोरोना व्हायरसची स्थिती पाहता तामिळनाडूत सोमवार, 24 मेपासून लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे ऐकताच रविवारी एका जोडप्याने चक्क विमानात लग्न केले. लग्नाच्यावेळी वधू-वर लग्नाचा पोशाखामध्ये सजले होते. या दोघांच्या या अनोख्या लग्नाची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथून मदुरैला वर गौरीपालयम येथील लाकूड व्यवसायिकाचा मुलगा राकेश व वधू उद्योगपतीची मुलगी दिक्षणा विमानाने येत होते. वऱ्हाडासाठी स्पाइसजेटचे पूर्ण विमान दोन्ही कुटुंबियांनी बुक केले होते. या फ्लाइटमध्ये वधू-वर यांच्यासह त्यांचे नातेवाईकही होते. स्पाइसजेट कंपनीच्या म्हणण्यानुसार या विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्टही झाली होती. मदुराईला जाण्यासाठी विमानाने आकाशात उड्डाण घेतले. विमान आकाशात पोहोचल्यावर मुला-मुलीने त्याच वेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनीही नातेवाईकांसमोर एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. यावेळी लग्नाचे इतरही विधी पार पडले.
या लग्नाबाबत वधू-वराला विचारले असता, ते म्हणाले की, कदाचित लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले जाण्याची शक्यता होती म्हणूनच लॉकडाउनच्या आधी त्यांनी लग्न केले व ते पुन्हा बंगळुरुला परत येतील. हौसेला मोल नाही या उक्तीप्रमाणे चक्क आकाशात लग्न करून राजेश व दिक्षणा यांनी सर्वांना चकित केले आहे. (हेही वाचा: Desi Jugaad Video: वाफ घेण्यासाठी तरुणाने लढवली अनोखी शक्कल, प्रेशर कुकरला बनवले स्टिमर)
दरम्यान, तामिळनाडू सरकारने शनिवारी कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी वाढविण्याची घोषणा केली. यापूर्वी राज्यातील लॉकडाऊन 24 मे रोजी संपुष्टात येत होता, त्यास आता एक आठवडा म्हणजे 31 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे.