‘विवाह’ (Marriage) हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. आजकाल लोक लग्नात खूप पैसा खर्च करू लागले आहेत. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग फोटोग्राफीचा ट्रेंडही खूप वाढला आहे. यासाठी बरेच पैसे खर्च होतात. तर लग्न हा जितका महत्वाचा टप्पा आहे तितकेच ते खर्चिकही आहे. साधारणपणे लग्नसमारंभात लोक त्यांच्या नातेवाईकांना आणि परिचितांना आमंत्रित करतात. पण पैशांची चणचण कधी कधी लग्नाच्या आनंदात विरजण घालू शकते. तर अशाच आर्थिक समस्येतून जात असलेल्या नववधूने लग्नात घातलेली एक अट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर वधूने लिहिलेले निमंत्रण पत्र सध्या व्हायरल झाले आहे. निमंत्रण पत्रानुसार, लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवणासाठी प्रति प्लेट $99 म्हणजेच सुमारे 7400 रुपये द्यावे लागतील. निमंत्रण पत्रात लिहिले आहे- 'आम्ही लग्नाला उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या जेवणाचा खर्च उचलण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे प्रत्येक प्लेटची किंमत $99 ठेवण्यात आली आहे.' याशिवाय लग्नात मुलांना आणू नये, अशी आणखी एक रंजक मागणी निमंत्रण पत्रात करण्यात आली आहे. (हेही वाचा: अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने बनवला पान आणि ब्राउनीचा कॉम्बो, व्हिडीओ पाहून लोकांचा राग अनावर, केल्या भन्नाट कमेंट)
याशिवाय लग्नाच्या ठिकाणी एक बॉक्स देखील होता, ज्यामध्ये लोक त्यांच्या इच्छेनुसार टाकू शकतात. मात्र, ते बंधनकारक करण्यात आलेले नाही. हनीमून, चांगले भविष्य आणि नवीन घर यासाठी पैसे टाकू शकता असे बॉक्सवर लिहिले आहे. सध्या ही वधू व लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. वधूच्या मित्राने रेडिटवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्याने सांगितले की, त्यांच्याकडे रिसेप्शनमध्ये खर्च करण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे त्यांना आपल्या पाहुण्यांना अशी अट घालावी लागली. लोकांनीही या दोघांची मागणी मान्य केली व लग्नाला पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीने सोबत पैसे आणले होते.