धक्कादायक! आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका लहान मुलासह नाचताना दिसत आहे. तसेच काही व्हिडिओंमध्ये हे दोघेही एकत्र काही चित्रपटांचे संवाद बोलतानाही दिसत आहेत. या व्हिडिओजवर अनेक लोकांनी आक्षेप नोंदवला म्हणूनच हे व्हायरल झाले आहेत. दिल्ली महिला आयोगाने या व्हिडिओबाबत कडक पावले उचलली आहेत. दिल्ली महिला आयोगाने यावर कारवाई करत, या महिलेविरूद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांना नोटीस पाठविली आहे.

दोन इंस्टाग्राम खाती आहेत. एक खाते महिलेचे आहे आणि दुसरे खाते तिच्यासोबत व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाचे आहे. दोन्ही इन्स्टाग्राम अकाउंट्स पाहिल्यावर हे लक्षात येते की, ही महिला त्या मुलाची आई आहे. यातील काही रील्समध्ये मुलगा आईसोबत डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. यावेळी तो महिलेच्या कंबरेला स्पर्श करताना दिसत आहे, तर काहींमध्ये महिलेला किस करताना दिसत आहे. लोकांनी अशा कृत्याविरोधात निषेध नोंदवला आहे.

असे व्हिडीओ बनवून मुलाला चुकीचे शिक्षण दिले जात आहे आणि आई आणि मुलामधील पवित्र नातेही कलंकित होत आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, असा मुलगा पुढे जाऊन मुलींबद्दल कसा विचार करेल आणि जर असेच चालू राहिले तर त्याच्यात गुन्हेगारी मानसिकता उद्भवू शकते.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या की, एकीकडे सोशल मीडिया ही आपली कला दर्शविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ प्रदान करीत आहे, तर दुसरीकडे, आजकाल काही लोक लोकप्रियता मिळविण्यासाठी लाजेच्या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. जिथे एका 10-12 वर्षाच्या लहान मुलास चांगली शिकवण देण्याची गरज आहे तिथे त्याची स्वत: ची आई त्याच्याबरोबर असे अश्लील व्हिडिओ बनवित आहे. आता त्यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. यामध्ये या महिलेविरूद्ध कडक कारवाई केली जावी आणि मुलाचे योग्य प्रकारे समुपदेशन केले जाण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.