Snake (PC -Pixabay)

सध्या चेन्नई विमानतळावरील (Chennai Airport) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत. गेल्या शुक्रवारी मलेशियाहून चेन्नई विमानतळावर पोहोचलेल्या एका महिला प्रवाशाचे सामान तपासले असता, त्यातून बाहेर निघालेल्या गोष्टी पाहून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. महिलेची बॅग उघडताच त्यातून एकामागून एक 22 प्रकारचे साप बाहेर पडले. या विस्मयकारक दृश्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हे साप वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये पॅक करून आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व साप वेगवेगळ्या प्रजातीचे असल्याचे दिसून आले. ही महिला 28 एप्रिल रोजी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून फ्लाइट क्रमांक एके 13 ने चेन्नई विमानतळावर पोहोचली होती.

कस्टम अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे महिलेला ताब्यात घेतले व तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या सामानामधून काय बाहेर पडले हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व्हिडिओमध्ये अधिकारी लांब काठीच्या मदतीने सापांना बाहेर काढताना दिसत आहेत. सामानाची तपासणी करताना महिलेच्या बॅगेत सापडलेले विविध प्रजातींचे 22 साप आणि एक गिरगिट जप्त करण्यात आला असून महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेला सीमा शुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा: जवळजवळ 100 हून अधिक भटक्या कुत्र्यांना ठार मारून कचऱ्यात फेकले, व्हिडीओ व्हायरल)

यापूर्वी जानेवारीमध्ये अशाच एका घटनेत, चेन्नई विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाने 45 अजगर, तीन मार्मोसेट, कासव आणि आठ साप जप्त केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कस्टम अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी बँकॉकहून आलेल्या दोन बेवारस पिशव्यांमधून हे प्राणी बाहेर पडले होते.