झोपाळू मंडळींसाठी खुशखबर! 'या' कंपनीची 'Sleep Internship' करून बदल्यात कमवता येणार 1 लाख रुपये, वाचा सविस्तर
Image For Representation (Photo: Facebook)

झोपेचं महत्व आणि सुख एखाद्या झोपाळू माणसालाच चांगले कळू शकते. त्यात थंडीच्या मोसमातील झोप म्हणजे दुग्धशर्करा योग. काही जण तर इतके झोपाळू असतात की झोप विरुद्ध जेवण, काम, पैसे अशा तुलनेत सुद्धा त्यांचा कल झोपेकडे वळतो. अशा झोपाळू मंडळींना आता कोणत्याच कारणासाठी आपल्या आवडीपासून दूर जावे लागणार नाही अशी एक नामी संधी बंगळुरु (Bengaluru) येथील वेकफिट (Wakefit) ही ऑनलाईन कंपनी घेऊन आली आहे. 'Sleep Internship 2020 Batch' असं या संधीचं नाव असून यामध्ये 100 दिवसांसाठी प्रत्येक रात्री 9 तास झोपण्याचे काम उमेदवाराला करायचे आहे. यासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1 लाख रुपयांचे वेतन मिळणार आहे. गाढ झोप घेतल्यास 30 टक्के तणाव होईल दूर - संशोधन

वेकफिट कंपनी ही गादीची विक्रेती आहे, या गाद्यांवर उमेदवारांना झोपून योग्य झोप लागते हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण असणार आहे . त्याचप्रमाणे उत्तम झोपेमुळे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते का या प्रश्नावर त्यांना तपास करायचा आहे. स्लीप ट्रॅकर आणि तज्ज्ञांची काउन्सिलिंग हे देखील इंटर्नशिपचा भाग असणार आहे. या स्लीप ट्रॅकरच्या माध्यमातून झोपेच्या पद्धती अभ्यासल्या जाणार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या झोपेचे पॅटर्न रेकॉर्ड करून त्यानुसार आपल्या उत्पादनात सुधारणा करण्यात मदत व्हावी हा यामागील हेतू असू शकतो.

वेकफीट कंपनीचे अध्यक्ष चैतन्य रामलिंगगौड़ा यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेची आवश्यकता लोकांना पटवून देण्यासाठी उचलले हे पाऊल आहे. यामध्ये आम्ही अशा लोकांवर प्रयोग करणार आहोत ज्यांना झोप प्रिय आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची किंवा घरापासून लांब राहण्याची गरज नाही. इतकेच काय तर काम करताना तुम्हाला तुमच्या पजामाज घालता येणार आहे.