प्रातिनिधिक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay)

सहसा, बहुतांश लोकांच्या मनात सापाबाबत (Snake) प्रचंड भीती असते. सापाला बघूनच बेशुद्ध पडणारे लोकही जगात आहे. मात्र रशियातील (Russia) एका व्यक्तीने स्टेप व्हायपर- साप (Viper Snake) सोबत एक अतिशय धोकादायक स्टंट केला, ज्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या माणसाने चक्क जिवंत साप गिळला. परंतु साप गिळण्याच्या स्टंटमुळे त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली आणि त्याच्या कुटुंबाला तर त्याहीपेक्षाही मोठी किंमत मोजावी लागली. या व्यक्तीला स्टंटदरम्यान सापाने चावा घेतला ज्यात त्याचा मृत्यू झाला.

रशियामधील 55 वर्षीय शेतमजूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो माणूस साप गिळताना दिसत आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, या व्यक्तीने साप गिळण्याचा दोनदा प्रयत्न केला, तिसऱ्या प्रयत्नात जेव्हा तो गिळू लागला तेव्हा साप त्याच्या जिभेला चावला. इतके होऊनही त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत व तो तसेच सापाला आपल्या तोंडात टाकू लागला. त्यावेळी मात्र सापाने त्याच्या गळ्याचा चावा घेतला.

काही तासानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी सांगितले की सापाच्या चाव्यामुळे त्या व्यक्तीला अॅलर्जी झाली आहे. जीभ आणि घसा पूर्णतः सुजला होता. डॉक्टरांच्या मते, त्या व्यक्तीला अॅनाफिलेक्टिक शॉक बसला होता. सापाच्या चाव्यामुळे त्या व्यक्तीची जीभ इतकी सुजली की, यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Two headed Russell’s Viper Rescued In Maharashtra: कल्याण येथे आढळला घोणस प्रजातीचा दुतोंडी विषारी साप; पाहा संपूर्ण व्हिडिओ)

अहवालानुसार या भागातील स्थानिक लोकांमध्ये साप गिळण्याची प्रथा आहे. येथे स्टेप व्हायपर टरबूजाच्या शेतात आढळतो, जो फार विषारी नसतो मात्र एखाद्या व्यक्तीस हानी पोहोचवू शकतो. आता या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना साप न गीळण्याचे आवाहन केले आहे.