चालत्या ट्रेनला लटकून स्टंट करताना अचानक घसरला हात व पुढे जे घडले...; रेल्वे मंत्री पियुष गोयलनी शेअर केला व्हिडीओ
Train Stunt (फोटो क्रेडिट-Twitter)

आपण नेहमीच टीव्हीवर एखाद्या कार्यक्रमात लोकांना स्टंट (Stunt) करताना पाहतो. मात्र बर्‍याच वेळा असे घडते की, आपण स्वतः हे स्टंट्स करून पाहण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालतो. काहीवेळा आपले नशीब चांगले असते, ज्यामुळे आपण वाचतो. पण प्रत्येक वेळी आपले नशीब साथ देईल असे नाही. सध्या ट्रेनमध्ये स्टंट (Railway Stunt)  करणाऱ्या एका युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चालत्या ट्रेनमध्ये हा तरुण गेटला लटकताना दिसत आहे. मात्र काही सेकंदानंतर, त्याचा हात निसटतो आणि तो ट्रेनमधून खाली पडतो. मात्र दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. यावेळी त्यांनी या युवकाचा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चालत्या रेल्वेमध्ये स्टंट करताना हा तरुण दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनला लटकलेला तरुण दिसतो, त्यानंतर अचानक त्याचा हात सुटतो व तो खाली पडू लागतो. यावेळी तो ट्रेनला पकडून वर यायचा प्रयत्न करतो मात्र धावत्या ट्रेनमध्ये त्याला ते शक्य होत नाही व तो खाली पडतो. मात्र यामध्ये या तरुणाचा जीव वाचला आहे. (हेही वाचा: मुंबई लोकल रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करणाऱ्यांनो सावधान! भोगावी लागेल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)

हा व्हिडीओ शेअर करताना रेल्वेमंत्री लिहितात, 'चालत्या ट्रेनमध्ये स्टंट दाखवणे शौर्य नव्हे, तर मूर्खपणाचे लक्षण आहे. आपले जीवन अमूल्य आहे, त्यास धोक्यात घालू नका. नियमांचे पालन करा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.' रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे.