पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकिचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचे पडसाद २०१९च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश निवडणुकीत पहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशातील मुरैंना येथे मंगळवारी (१६ ऑक्टोबर) झालेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सभेत कार्यकर्त्यांना एक हटके प्रसंग पहायला मळाला. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. कार्यकर्त्यांना संबोधीत करताना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच नक्कल केली. राहुल गांधी यांची भाषणे रटाळ आणि प्रभावहीन असतात, अशी टीका त्यांचे विरोधक करतात. पण, राहुलही आता भाषण आणि नेतृत्वात चांगलेच तरबेज झाल्याचे त्यांच्या अलिकडील काही भाषणांमधून पहायाला मिळते. मुरैंना येथे झालेले भाषण त्याचीच साक्ष देणारे होते, अशी चर्चा आता काँग्रेस वर्तुळात सुरु झाली आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, 'स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणारे पंतप्रधान मोदी जेव्हा जनतेशी बोलतात तेव्हा मित्रों म्हणतात. पण, दसऱ्याबाजूला तेच जेव्हा, उद्योगपती अनिल अंबानी किंवा हिरेव्यापारी नीरव मोदी यांच्यासारख्या मंडळींशी बोलतात तेव्हा, त्यांचा उल्लेख भाई म्हणून करतात.' महत्त्वाचे असे की, राहुल गांधींनी ही वाक्येही खास स्टाईलने उच्चारली. ज्यातून ते पंतप्रधान मोदींचीच नक्कल करत आहेत, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. (हेही वाचा, सर्वसामान्य आहोत! राजकीय पक्षांनी मत मागून लाजवू नये; भोपाळमध्ये झळकली पोस्टर्स, 'नोटा'साठी अवाहन)

पुढे बोलताना हाच मुद्दा लावून धरत राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान म्हणतात की, मित्रों... मला प्रधानमंत्री म्हणू नका. चौकीदार म्हणा. पण, हेच चौकीदार जेव्हा जनतेशी बोलतात तेव्हा केवळ मित्रों... म्हणतात. पण, जेव्हा उद्योगपतींशी बोलतात तेव्हा, मेहूल चोक्सीला मोहूल भाई, अनिल अंबानींना अनील भाई किंवा नीरव मोदीला नीरव भाई असे म्हणतात.', असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, राहुल यांच्या या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येते याबाबत उत्सुकता आहे.