(Photo Credit: ANI)

मध्य प्रदेशमध्ये २०१९ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.दरम्यान, या राजकीय रणधुमाळीत मध्यप्रदेशमध्ये सध्या काही हटके पोस्टर्सनी लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही पोस्टर्स कोणा एखाद्या राजकीय पक्षाला मत द्या, असे सांगण्याऐवजी नोटा या पर्यायाचा वापर करुन नोटाला मत देण्याविषयी मतदारांना आवाहन करते आहे. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.

एएनआयने या पोस्टरच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ''मी एक सर्वसामान्य वर्गातील व्यक्ती आहे. कृपा करुन कोणत्याही राजकीय पक्षाने मत मागून मला लाजवू नये. नोटाला मत द्या (वोट फॉर नोटा) '' हे पोस्टर भोपाळमधील अनेक लोकांच्या घराबाहेर लागली आहेत. राज्यामध्ये २८ नोव्हेंबरला निवडणुका पार पडत आहेत. (हेही पाहा,भाजप नेते बिनविरोध जिंकले पण, हत्तीवरुन पडले)

दरम्यान, वृत्तसंस्थेने लोकांशी संवाद साधला तेव्हा, स्थानिक लोकांनी सांगितले, 'एससी/एसटीला मिळणारे आरक्षण रद्द व्हावे. ते सर्वसामान्य व्यक्तिला फार अडचणीचे ठरत आहे. आम्ही येत्या निवडणुकीत नोटाचा वापर करु.'

दरम्यान, २०१४पासून जोरदार मुसांडी मारत गल्ली ते दिल्ली सत्ता काबीज करणाऱ्या आणि सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसमध्ये या निवडणुकीत काट्याची टक्कर पहायला मिळेल. मधल्या काळात काँग्रेसही बऱ्यापैकी सावरली आहे. तर, सत्ता दिल्यानंतर भाजपने काय आणि कसे काम केले, हेसुद्धा जनतेसमोर आहे.