Fact Check: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy लष्कराचा गणवेश घालून युद्धात उतरले? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य
President of Ukraine Volodymyr Zelenskyy (PC - Twitter)

Fact Check: युक्रेनमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. या संकटाच्या काळात सोशल मीडियावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लष्कराचा गणवेश परिधान केलेले दिसत आहेत. व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये ते रशियाविरुद्धच्या युद्धात उतरल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युद्धाच्या तिसऱ्या दिवशी रशियन सैनिक युक्रेनची राजधानी कीवमध्ये पोहोचले आहेत. अशा स्थितीत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दावा केला जात आहे की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की स्वतः रशियन सैन्याशी लढण्यासाठी मैदानात उतरले आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या व्हायरल फोटोंमागील सत्य...

रॉयटर्सच्या मते, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा हा फोटो 9 एप्रिल 2021 चा आहे. यादरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी डॉनबास भागातील लष्करी तळाला भेट दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो 21 एप्रिल 2021 च्या बातमीसोबत वेबसाईटवरही प्रकाशित करण्यात आला होता. तपासाच्या पुढील प्रक्रियेत, राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचा आणखी एक व्हायरल फोटो ‍ग्लोबीअँड मेलवर रिव्हर्स सर्च करताना बातम्यांसह सापडला. (वाचा - Ukraine-Russia War: Vladimir Putin एक दिवस जगावर राज्य करतील; Bulgarian Baba Vanga यांनी केली होती भविष्यवाणी)

वेबसाइटनुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा हा फोटो 6 डिसेंबर 2021 रोजी पूर्व युक्रेनमधील आहे. जिथे झेलेन्स्की युक्रेन आर्म फोर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी लष्कराला भेटण्यासाठी आले होते. या तपासणीनंतर सोशल मीडियावर व्हायरल फोटोंसह करण्यात येत असलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची ही छायाचित्रे युद्धकाळातील नसून जुनी आहेत.

व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताकडे मागितली मदत -

या संकटाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. यावेळी त्यांनी युक्रेनमधील परिस्थिती स्पष्ट करत भारताकडे मदत मागितली. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली होती.