गेल्या काही वर्षांमध्ये अलेक्सा (Alexa) उपकरणाचा वापर फार वाढला आहे. अलेक्सामुळे लोकांचे रोजचे जीवन काही प्रमाणात सुखकारक झाले आहे. आता अॅमेझॉनने गेल्या वर्षी अॅलेक्साला भारतीय वापरकर्त्यांनी विचारलेले शीर्ष प्रश्न उघड केले आहेत. ट्विटरच्या संस्थापकापासून ते बिटकॉइनच्या किंमतीपर्यंत, देशातील वापरकर्त्यांनी अॅलेक्साला चित्र-विचित्र प्रश्न विचारले आहेत.
अनेक वापरकर्ते बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमालीचे उत्सुक होते. त्यांनी अलेक्साला सलमान खानच्या रोमँटिक नात्यापासून ते त्याच्या लग्नाच्या योजनेपर्यंत अनेक प्रश्न विचरले आहेत.
यातील सर्वाधिक विचारले गेलेले प्रश्न म्हणजे, ‘अलेक्सा, सलमान खान की गर्लफ्रेंड कौन है?’ (अलेक्सा, सलमान खानची गर्लफ्रेंड कोण आहे?) आणि ‘अलेक्सा, सलमान खान की शादी कब होगी?’ (अलेक्सा, सलमान खान लग्न कधी करणार?) हे होते. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये भारतीय युजर्सनी वर्षातील ट्रेंडिंग विषय, सेलिब्रिटी, सण, खेळ आणि इतर अनेक प्रश्नांबाबत अलेक्साची मदत घेतली आहे.
अनेक युजर्सनी माहितीपर गोष्टी जाणून घेण्यासाठी अलेक्साची मदत घेतली आहे. ‘अलेक्सा, बुर्ज खलिफाची उंची किती आहे?’ आणि ‘अलेक्सा, पृथ्वीवरील सर्वात उंच व्यक्ती कोण आहे?’, हे दोन प्रश्न गेल्या वर्षी व्हॉईस सर्व्हिसला विचारलेल्या सर्वाधिक प्रश्नांपैकी होते. यासह भारतीय युजर्सनी ‘अलेक्सा, आलिया भट्टचे वय काय आहे?’, ‘अलेक्सा, केंडल जेनर किती वर्षांची आहेत?’ असे प्रश्न विचारूनही अलेक्साला भंडावून सोडले.
गेल्या वर्षभरात T20 क्रिकेट आणि फुटबॉलच्या जागतिक स्पर्धा झाल्या. अशावेळी खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी युजर्स अलेक्साकडे वळले. ‘अलेक्सा, स्कोअर काय आहे?’ आणि ‘अलेक्सा रोनाल्डो व मेस्सी यांमध्ये कोण उत्कृष्ट आहे?’ असे काही प्रश्न अलेक्साला विचारले गेले. देशातील अनेक खाद्यप्रेमींनी या व्हॉईस सर्व्हिसच्या मदतीने बिर्याणी, डोसा, मसाला चाय आणि इतर अनेक आवडते पदार्थ बनवले. अनेकांनी अलेक्सासोबत विनोदी संवाद साधत आपला वेळ व्यतीत केला. ‘अलेक्सा, मला आंघोळ करायला हवी का?’ आणि ‘अलेक्सा, तुझा भूता-खेतांवर विश्वास आहे का?’, हे 2022 मध्ये वापरकर्त्यांनी विचारलेल्या सर्वात अकल्पनीय प्रश्नांपैकी होते. (हेही वाचा: Reliance Jio 5G Network: Jio 5G नेटवर्क सेवा देशभरातील 184 शहरांमध्ये लॉन्च; 50 शहांमध्ये Rollout)
दरम्यान, अलेक्सा हे अॅमेझॉनने विकसित केलेले व्हर्च्युअल असिस्टंट आहेत, जो एक स्मार्ट स्पीकर आहे. अनेक भाषांमध्ये हे उपकरण उपलब्ध असून, 2017 मध्ये अॅमेझॉन कंपनीने ते भारतात लॉन्च केले होते. अलेक्सा हे व्हॉइस असिस्टंट असून ते स्मार्टफोन आणि अॅमेझॉनच्या इको उत्पादनांशी कनेक्ट करून वापरले जाऊ शकते. अलेक्सा केवळ आवाजाद्वारे वापरकर्त्याशी संवाद साधण्याटच सक्षम नाही, तर तुम्ही त्याद्वारे संगीत प्ले करू शकता, अलार्म सेट करू शकता, कामाच्या सूची बनवू शकता, ऑडिओबुक प्ले करू शकता आणि इतर गोष्टींसह सर्व प्रकारची माहितीही प्राप्त करू शकता.