Screw Found in Sandwich: इंडिगो फ्लाईटच्या प्रवासादरम्यान सँडविचमध्ये आढळला लोखंडी नट, प्रवाशाचा दावा; फोटो व्हायरल
Screw Found in Sandwich | (Photo courtesy: Reddit)

इंडिगो (IndiGo) फ्लाइटने हवाई प्रवास करताना मागवलेल्या सँडविचमध्ये (Sandwich) चक्क लोखंडी नट (IndiGo Passenger Finds Screw in Sandwich) सापडल्याचा दावा एका प्रवाशाने केला आहे. या प्रवाशाने सोशल मीडिया हँडलवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका पालक आणि कॉर्न सँडविचमध्ये मिसळलेला नट पाहायला मिळतो. ज्यामुळे इंडिगो फ्लाईटमधील अन्नसुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लेटेस्टली मराठी या फोटोची पुष्टी करत नाही. 'बंगलोर' रेडडिट वापरकर्त्याने आपल्या @MacaroonIll3601 या हँडलवरुन हा फोट शेअर केला आहे.

बंगळुरू ते चेन्नई प्रवासादरम्यानची घटना

सोशल मीडियावरील @MacaroonIll3601 या हँडलच्या युजरने (Reddit वपरकर्ता) म्हटले आहे की,  इंडिगो फ्लाइट बेंगळुरू ते चेन्नईच्या दरम्यान सर्व्ह केलेल्या सँडविचमध्ये स्क्रू सापडला. प्रवाशाने आपल्या पोस्टमध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी बंगळुरू ते चेन्नई फ्लाइट दरम्यान आलेल्या त्रासदायक अनुभवाचे तपशीलवार वर्णन केले आहे. दरम्यान, युजरने पोस्ट करताच त्याला नेटीझन्सकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी फोटो पाहून तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. एअरलाइन केटरिंग सेवांमध्ये गुणवत्ता वाढवण्याच्या अत्यावश्यकतेकडे लक्ष वेधले. (हेही वाचा, Air India Viral Video: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला जेवणात आढळल्या अळ्या; मुंबई-चेन्नई प्रवासादरम्यान बिझनेस क्लासमधील घटना)

अन्नसुरक्षेचा अनेकदा प्रवाशांना फटका

कॉर्पोरेट कंपन्यांची किंवा सरकारी वाहतूक यंत्रणा वापरुन प्रवासकरताना येणाऱ्या त्रासदायक अनुभवांचे प्रमाण कमी नाही. अनेकदा अनेक प्रवाशांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. नुकत्याच एका प्रवाशाला वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना जेवणात अळी सापडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे आयआरसीटीसीने सदर प्रवाशाची माफी माहून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले.

एअर इंडिया विमानातही अशाच प्रकारची घटना

अलिकडेच एअर इंडिया विमानाने मुंबई ते चेन्नई प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला त्याच्या जेवणात अळ्या सापडल्या होत्या. या प्रवाशानेही या भयंकर प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. जो व्हायरल होताच एअर इंडियाने तातडीने दखल घेतली आणि सदर प्रवाशाची माफी मागितली. तसेच, असा प्रकार पुन्हा घडणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही एअर इंडियाने या निमित्ताने त्यांच्यासर्व प्रवाशांना दिले.

व्हायरल पोस्ट

Got a screw in my sandwich

byu/MacaroonIll3601 inbangalore

दरम्यान, अन्नपदार्थांमधील सुरक्षीतता हा नेमहीच चिंतेचा विषय ठरला आहे. वंदे भारत ट्रेन, विमान सेवा यांमधून दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत प्रवाशी सतर्क असतात. त्यामुळे असे प्रकार पुढे येतात. मात्र, रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या, विविध हॉटेल, उपहारगृहांतून विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्येही अनेकदा असा प्रकार पाहायला मिळतो. मात्र, त्याची फारशी वाच्यता होत नाही. त्याविरोधात कोणी फारसा आवाज उठवत नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे नागरिक सांगता.