प्रणय कुमार, अमृताचा पोस्ट वेडींग व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर शेकडो लाईक, शेअर
प्रणय कुमार आणि अमृता वार्षिणी (Image: YouTube Video)

प्रणय कुमार आणि अमृता वार्षिणी. वय अनुक्रमे २३ आणि २१ वर्षे. दोघेही सालस, सुस्वभावी. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पती-पत्नी. पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी. लहानपणापासून फुललेल्या प्रेमाच्या झाडाला वयानुरुप बहर आला. त्यांनी रितसर लग्न केले. त्यांचा संसारही सुरु झला. दोघेही शिक्षित. निर्णयाच्या बाबतीत दोघेही विचारी. संसाराच्या वेलीवर त्यांच्या आनंदाला पार राहिला नव्हता. दोघांनाही बडती मिळणार होती. अमृता गर्भवती होती. आपण-आई-बाबा होणार म्हणून दोघेही प्रचंड उत्साही. आनंदी. प्रणय अमृताची खूप काळजी घ्यायचा. खोट्या प्रतिष्ठेने आणि बुरसटलेल्या विचारात अडकलेल्या मानवनिर्मित काळाचा घाला पडण्यापूर्वीही तो अमृतासोबतच होता. अगदी घटना घडली तेव्हाही. दोघे इस्पितळातून बाहेर पडत होते. त्यांचे सगळे छान चालले होते. पण, अमृताच्या घरच्यांसाठी या दोघांचे सुखच दुख:चे कारण ठरत होते. अमृतासोबत इस्पितळातून बाहेर पडत असलेल्या प्रणयवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. त्यात प्रणयचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर देशभर खळबळ उडाली. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातूनही आवाज उटला. सध्या प्रकरणाचा तपास पोलीस दरबारी सुरु आहे. दरम्यान, प्रणय आणि अमृता याच्या लग्नापूर्वीचा (पोस्ट वेंडींग) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून सोशल मीडिया हळहळत तर आहेच. पण, प्रणयच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणीही करत आहे.

कोणत्याही प्रेमी युगुलाने पहावा असा हा व्हिडिओ. पाहताना प्रणयचा खूनी मृत्यू झाला असावा यावर विश्वासच बसत नाही. प्रणयला त्याच्या गर्भवती पत्नीसमोरच धारधार शस्त्राने वार करुन मारेकऱ्याने ठार केले. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील इस्पितळाबाहेर १४ सप्टेंबरला ही घटना घडली. या घटनेनंतर दोघांच्या लग्नापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपण बॉलिवूडचा एखादा चित्रपट पहावा असा भास व्हावा, इतका हा व्हिडिओ सुंदर बनवला आहे. या व्हिडिओत दोघांचे हावभाव आणि चेहऱ्यावरच्या भावमुद्रा प्रचंड बोलतात. त्या पाहून दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे क्षणोक्षणी दिसते.

दरम्यान, प्रणयच्या जाण्याने अमृतावर आभाळ कोसळले आहे. ती काहीशी घाबरली, थकली आहे. पण, खचली मुळीच नाही. प्रणय गेला. पण, जाताना तो आपल्याला एक सोबती देऊन गेला, असे ती पोटावर हात ठेऊन सांगते. आपल्या वडील आणि काकानेच हे कृत्य घडवून आणल्याचा अमृताचा आरोप आहे. प्रणयला न्याय मिळेपर्यंत आपण लढा देणार असल्याचे आमृता ठासून सांगते.

मुलीच्या संसारापेक्षा अमृताच्या बापाला सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत होती. अमृताचे वडील टी मारुती राव हे रिअल इस्टेट क्षेत्रातील एक बडे नाव. प्रतिष्ठीत आणि श्रीमंत व्यक्तिंमध्ये त्यांची गणना होते. आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह करणे त्यांच्या विचारांना पटले नाही. त्यांनी आणि घरातल्या सर्वांनीच अमृताला लग्नाच्या निर्णयाला विरोध केला. पण, सर्वांच्या विरोधात जाऊन अमृताने प्रणयसोबत लग्न केले. जानेवारी महिन्यात दोघे विवाहबद्ध झाले. माझ्या कुटुंबीयांपासून आम्हाला धोका असल्याचे आम्हाला माहिती होते. पण, ते या पातळीला जातील असे स्वप्नातही वाटले नव्हते. आम्ही काही काळ लपून राहिलो. अलिकडे तर आम्ही विदेशात जाण्याची तयारी करत होतो. पण, मी आई होणार असल्याने काही काळ इथेच राहण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असे आमृता सांगते. पोलिसांना दिलेल्या जबानीत अमृताने तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. तसेच, प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी टी मारुती रावने १ कोटी रुपयाची सुपारी दिल्याचीही चर्चा होती.