Empire State Building (Photo Credits: @EmpireStateBldg/ Twitter)

भारतामध्ये सध्या दिवाळीची (Diwali 2020) धूम पाहायला मिळत आहे, जगाच्या पाठीवर कुठेही हिंदू धर्मीय लोक असोत, ते दिवाळी साजरी करतातच. अमेरिका हा त्यातीलच एक देश. अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारतीय हिंदू आहेत त्यामुळे दरवर्षी इथे मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते. आता या दिवसाचे औचित्य साधत अमेरिकेमधील प्रसिद्ध 'एम्पायर स्टेट बिल्डिंग' (Empire State Building) ही दिवाळीनिमित्त केशरी रंगात उजळून निघाली होती. हा दिव्यांचा सण साजरा करण्यासाठी शुक्रवारी बिल्डींगवर केशरी रंगाचे दिवे लावण्यात आले. सध्या या गोष्टीचे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या पार्टनरशिपमध्ये न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कनेक्टिकट या त्रिकोणीय क्षेत्राच्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन (FIA) ने मॅनहॅटनच्या प्रसिद्ध 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'वर केशरी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. याबाबत एम्पायर स्टेट बिल्डिंगने ट्वीट करत माहिती दिली आहे.

एफआयएने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ‘दिवाळी सूप अँड किचन’ च्या पुढाकाराने न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि कनेक्टिकटमध्येही विविध प्रेक्षकांना दिवाळीच्या उत्सवाशी संबंधित भारतीय परंपरा, संस्कृती आणि चालीरीतींची माहिती करून द्यावी या उद्देशाने 10,000 जेवणाच्या थाळ्या देण्यात आल्या. एफआयएचे अध्यक्ष अंकुर वैद्य यांनी ‘दिवाळी सूप आणि किचन’ याची कल्पना मांडली होती. अशाप्रकारे दरवर्षीच 'एम्पायर स्टेट बिल्डिंग' ही दिवाळी व भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त विविध रंगांमध्ये सजवण्यात येते. (हेही वाचा: Gold Jewellery Sales: लॉकडाऊन असूनही धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची मोठी विक्री; आकडा पाहून बसेल धक्का)

दरम्यान, भारतामध्ये काल अयोध्येतील शरयूतीरी दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी नदीच्या काठावर 5,84,572 मातीचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये 'मोठ्या प्रमाणावर तेलाचे दिवे प्रज्वलित' करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.