Fake WhatsApp post on COVID-19 guidelines attributed to ICMR (Photo Credits: WhatsApp)

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रूग्णांमध्ये मागील काही दिवस 24 तासांत झपाट्याने वाढ होत आहे. अशामध्ये आता पुन्हा नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये यच भीतीचा गैरफायदा घेत खोट्या बातम्या पसवल्या जात आहेत. अशामध्येच आता ICMR च्या नावाने खोटी नियमावली व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) पसरवली जात आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की,' भारतीयांनी पुढील 2 वर्ष परदेशवारी तर 1 वर्ष बाहेरचं खाणं टाळावं.' मात्र अशाप्रकारची कोणतीच सक्ती आयसीएमआरने केलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर लांब लचक नियमावली व्हायरल होत आहे  मात्र  ती आयसीएमआरकडून प्रसारित करण्यात आलेली नाही.

दरम्यान परदेशवारी करू नका, बाहेरचं खाणं टाळा, मॉल्समध्ये जाऊ नका, सिनेमा हॉलमध्ये जाणं टाळा अशा सूचना त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत असला तरीही त्याला रोखण्यासाठी सरकारने अनलॉक 4 अंतर्गत काही सेवा खुल्या आहेत. तर 30 सप्टेंबर पर्यंत कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम केला आहे. अशावेळी आयसीएमआरने अजून वेगळी, स्वतंत्र गाईडलाईन जारी केलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून सहाजिकच अनावश्यक गर्दी, विनाकारण प्रवास टाळणं हितकारी आहे. परंतू त्याची सक्ती नाही. लॉकडाऊन दरम्यान गडगडलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात पुन्हा व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र त्यावेळेस खबरदारी घेत बाहेर पडण्याची, प्रवास करण्याची मर्यादीत परवानगी आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या नावाने पसरवले जाणारे खोटे मेसेज फॉर्वर्ड करू नका तसेच त्यावर विश्वास देखील ठेवू नका.