Fact Check: लस घेतलेल्या लोकांच्या शरीरावर Bill Gates चा हक्क; व्हायरल होत आहे ऑडिओ क्लिप, जाणून घ्या सत्य
Bill Gates | (Photo Credits: Facebook)

जागतिक महामारी कोरोना विषाणूची (Coronavirus) अनेक रूपे एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. प्रत्येक नवीन व्हेरिएंट जुन्या प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. मात्र कोरोना विरोधी लसीमुळे या विषाणूवर काही प्रमाणात मात करता येऊ शकते असे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनापासून स्वतःला वाचवायचे असेल तर लोकांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले आहे. प्रत्येक देश सध्या आपल्या क्षमतेनुसार लसीकरण अभियान चालवत आहे. दुसरीकडे काही लोक आहेत जे या लसीच्या विरोधात आहेत. हे लोक सोशल मिडियावर लसीच्या विरोधात अनेक खोटे मेसेजेस पसरवत आहेत.

हे लोक, ‘लस’ मानवी जीवनासाठी धोकादायक असल्याचे सांगत आहेत. लसीकरण मोहिमेला लोकांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र म्हणत आहेत. एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये म्हटले जात आहे की, ‘आणीबाणीची परिस्थिती नसूनही सरकार लस घेण्यासाठी दबाव टाकत आहे. आतापर्यंत बनवलेल्या सर्व लसी, त्यातील सर्व साहित्य, या सर्वांचे पेटंट बिल गेट्स यांच्या नावावर आहे. त्यामुळे जे लोक ही लस घेतील अशा लोकांच्या शरीरावर त्यांच्या पालकांचा नाही तर, बिल गेट्सचा अधिकार राहील. बिल गेट्स हे त्या शरीराचे मालक होतील. लस घेणाऱ्या व्यक्तीचे शरीर एक्सपेरिमेंटल शरीर बनेल, कारण या लसींची चाचणी सुरू आहे.

ऑडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लोकांना जी लस दिली जात आहे ती प्रत्यक्षात लस नाही. ही एक्सपेरिमेंटल जीन थेरपी आहे, जी तुमचा डीएनए डीकोड करत आहे. डीएनए डीकोड करून तो बदलला जाईल. अशा प्रकारे तुमचे शरीर पोकळ करून ते रोगांसाठी तयार केले जाईल. लस घेतल्यानंतर तुम्ही आयुष्यभर आजारी पडणार आहात. (हेही वाचा: Fact Check: पंतप्रधान रामबाण योजनाद्वारे उपचारासाठी मिळत आहेत 4000 रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य)

हा मेसेज व्हायरल होऊ लागल्यानंतर, सरकारी संस्था पीआयबीने या ऑडिओबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. PIB FactCheck ने ऑडिओ तपासल्यानंतर सांगितले आहे की, हे सर्व दावे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. देशात दिल्या जाणाऱ्या सर्व लसी सुरक्षित आहेत. यासोबतच लसीशी संबंधित अशी दिशाभूल करणारी माहिती शेअर करू नका.