Fact Check: पंतप्रधान रामबाण योजनाद्वारे उपचारासाठी मिळत आहेत 4000 रुपये? Fake Message व्हायरल, जाणून घ्या सत्य
Fact Check (Photo Credit Twitter)

आजकाल सोशल मिडियावर जनतेला भुलवणाऱ्या अनेक बातम्या (Fake News) दिसून येतात. यातील कोणती बातमी अथवा माहिती खरी आणि कोणती खोटी हे सांगणे अवघड आहे. सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी खूप चर्चेत आहे. लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर या बातमीबाबत मेसेज येत आहेत. या बातमीमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनासाठी (PM Ramban Yojana) नोंदणी सुरु आहे. या नोंदणीनंतर प्रत्येक व्यक्तीला योजनेद्वारे उपचारासाठी 4000 रुपये दिले जातील.

या मेसेजसोबत एक लिंक देण्यात आली असून नोंदणीसाठी त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले आहे. सर्वात आधी हे समजून घ्या की, आजकाल सायबर हल्ल्यांचे प्रमाण फार वाढले आहे. असे चोर अनेक मार्गांनी लोकांना आमिष दाखवून ऑनलाईन त्यांच्या पैशांवर डल्ला मारतात. आताही पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेबाबतच्या या संदेशाबद्दल असेच काहीसे दिसून येत आहे. केंद्रीय माहिती एजन्सी PIB ने या संदेशाची पडताळणी केली असता, हा मेसेज पूर्णतः खोटा असल्याचे दिसून आले.

पीआयबीने लोकांना चेतावणी दिली आहे की, केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा नावाची कोणतीही योजना चालवली जात नाही. लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी बनावट वेबसाइटद्वारे असे डावपेच अवलंबले जातात, ज्याबाबत लोकांनी काळजी घ्यावी. अशा वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. (हेही वाचा:  'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत मिळणार 2.20 लाख रुपयांची रोख रक्कम व 25 लाखांपर्यंतचे कर्ज; जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य)

PIB ही केंद्रीय माहिती संस्था आहे. ही संस्था सरकार, मंत्रालय आणि त्याच्या संबंधित विभागांबद्दल दिशाभूल करणारी आणि चुकीच्या माहितीची पडताळणी करते. तसेच, काही दिशाभूल करणारी माहिती आढळून आल्यास लोकांना सावध करण्याचे कामही पीआयबीकडून केले जाते.