भारतामध्ये फार पूर्वीपासून हुंडा (Dowry) प्रथा चालू आहे. आजकाल याचे प्रस्थ बरेच कमी झाले असले तरी, अजूनही काही ठिकाणी हुंडा मागितला जातो आणि दिलाही जातो. देशात हुंडा बंदी कायदा, 1961 नुसार, हुंडा घेणे, देणे किंवा त्यासाठी मदत करणे यासाठी 5 वर्षे तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंडाची तरतूद आहे. अशात 'भेटवस्तूं'च्या रुपात हुंडा दिला जातो. यामध्ये पैशांपासून ते अनेक वस्तूंपर्यंतच्या गोष्टींचा समावेश असतो. आता सोशल मिडियावर एका लग्नातील कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 'भेटवस्तू' म्हणून मिळालेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन दिसत आहे.
लग्नठिकाणच्या लॉनमध्ये अगदी स्वयंपाकघरातील साधनांपासून ते निसान मॅग्नाइटपर्यंत, अनेक गोष्टी सादर केल्या गेल्या होत्या.या लग्नामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात 'भेटवस्तू' दिल्याचे पाहून लोकांना आश्चर्य वाटले की हे लग्नातील दृश्य आहे की बाजारपेठ. या वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या की नाही याची पुष्टी झाली नाही. अहवालानुसार, या लग्नामध्ये 100 हून अधिक गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या भेटवस्तूंमध्ये एसयूव्ही, स्वयंपाकघरातील उपकरणे, साधने, फर्निचरच्या, रेफ्रिजरेटर, व्होल्टास एसी, वॉशिंग मशीन, कपाट, बेड आणि सोफा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटिझन्सनी हा एक प्रकारचा वाजार अथवा सुपर मार्केट असल्याचे दिसत असल्याचे सांगितले. एकाने म्हटले आहे, ‘असा हुंडा जगासमोर दाखवण्याची कल्पनाही करवत नाही, मात्र आता ते प्रत्यक्षात दिसत आहे. हे अतिशय हास्यास्पद आहे. लग्नात हुंडा म्हणून रोख रकमेच्या बदल्यात कार अथवा असे सामान घेणाऱ्या लोकांची लाज वाटते.’ (हेही वाचा: IndiGo Flight मध्ये सीटवर कुशनच नाही; सोशल मीडीयात वायरल फोटो नंतर अनेकांनी व्यक्त केला संताप)
दरम्यान, याआधी आणखी एका हुंडा प्रकरणात राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील धिंगसारा गावातील चार भावांनी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी हुंडा म्हणून 8 कोटी 31 लाख रुपयांची मोठी रक्कम दिल्याचे समोर आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हुंड्यात रोख रक्कम, जमीन, सोने, चांदी, ट्रॅक्टर यांचा समावेश होते. तसेच 800 नाणी गावकऱ्यांमध्ये वाटण्यात आली होती.