Traffic Constable Hols Baby on Duty (Photo Credits: YouTube)

आजकाल प्रत्यके क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत. महिलांची इच्छाशक्ती, काम करण्याची ताकद, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेले प्रयत्न पाहून कोणालाही त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कोणतेही असो, मनात आणले तर एका महिला येणाऱ्या संकटांवर मात करीत कशी खंबीरपणे उभा राहू शकते याची अनेक उदाहरणे आपण पहिली आहेत. आताही असेच एक उदाहरण चंदिगढ मधून समोर येत आहे. येथे एक महिला पोलीस छोट्या बाळाला कडेवर घेऊन रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करताना दिसत आहे. या गोष्टीचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

याबाबत अनिल देशमुख म्हणतात, ‘छत्रपती शिवरायांच्या काळात 'हिरकणी' गवळण आपल्या तान्हुल्यासाठी रायगडावरील कठीण कडा उतरली होती. आजच्या समाजातही कर्तव्य बजावून मातृत्व जपणारी 'हिरकणी' बघितल्यावर अभिमानाने उर भरून येतो! चंदीगडमध्ये बाळाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या पोलीस महिलेला माझा त्रिवार सलाम!’

8 मार्च रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. देश, जात, भाषा, राजकीय आणि सांस्कृतिक भेदभाव न बाळगता जगभरातील महिलांसाठी एकत्रितपणे हा दिवस साजरा केला जातो. महिला दिनाच्या 2 दिवस आधी चंदिगढ येथून हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याचे ट्विटरवर खूप कौतुक होत आहे. या व्हिडिओमध्ये, महिला वाहतूक पोलीस तिच्या मुलाला कडेवर रहदारीची व्यवस्था सांभाळताना दिसत आहे. व्हिडिओ शुक्रवारी सकाळी 11 वाजताच आहे, जेव्हा चंडीगड ट्रॅफिक पोलिसांची महिला कॉन्स्टेबल प्रियंका चंदीगडच्या सेक्टर 15-23 चौकात ड्यूटी करत होती.

(हेही वाचा: International Women's Day 2021 Doodle: जागतिक महिला दिनानिमित्त Google ने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा Doodle द्वारे केला सन्मान!)

दरम्यान, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यातील महिला, मग ती आई असो, पत्नी असो, बहिण असो वा मैत्रीण असो आपल्याला काही ना काही शिकवण देत असते. आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रियंकानेही आपल्या सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. लेटेस्टली मराठीकडून प्रियंकाच्या या कार्याला सलाम.