अटलांटामध्ये रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस (Photo Credits: Twitter)

पैशांचा पाऊस ही कल्पना कितीही सुखावह वाटली तरी ती स्वप्नवतच आहे. मात्र अमेरिकेत याचा खराखुरा प्रत्यय आला आहे. अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांताची राजधानी अटलांटामध्ये हायवेवर चक्क पैशांचा म्हणजेच डॉलर्सचा पाऊस पहायाला मिळाला.

अटलांटामधील एका हायवेवरुन एक डॉलर वाहून नेणारी गाडी जात होती. मात्र गाडीचा दरवाजा उघडा राहिल्याने सगळे डॉलर्स हवेत उडू लागले. हवेत उडत असलेले डॉलर्स गोळा करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ:

बराच वेळ डॉलर्स गाडीत बाहेर उडत असल्याची कल्पना गाडीतील लोकांना नव्हती. त्यामुळे बरेच डॉलर्स उडून गेले. त्यावेळी लोकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावत डॉलर्स गोळा केले.

डाऊनवूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक आणि गाडीतील लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तब्बल 1 कोटी 20 लाख डॉलर्स हवेत उडाले. यापैकी 1 लाख डॉलर्स परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. अनेकांनी स्वतःहून डॉलर्स पोलिसांकडे सुपूर्त केले. तर 75 हजार डॉलर्स लोकांनी गोळा करत तेथून पळ काढला. व्हिडिओच्या आधारे पोलिस या लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.

गाडीतून पैसे उडून जाण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील दोनदा अशा घटना घडल्या आहेत.