भरताबाहेर पळालेला स्वयंघोषीत बाबा नित्यानंद (Baba Nithyananda) याने पुन्हा एकदा नवी घोषणा केली आहे. येत्या सहा महिन्यात 'कैलासा हिंदू संसद' (Kailasa Hindu Parliament) निर्माण करणार असल्याचे नित्यानंद याने म्हटले आहे. नुकतीच त्याने 'रिजर्व बँक ऑफ कैलासा' (Reserve Bank of Kailasa) निर्मिती केल्याची घोषणा केली होती. नित्यानंद याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन रविवारी (23 ऑगस्ट) नवी घोषणा केली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, 'गणपती बाप्पाच्या अशीर्वादाने आम्ही हिंदू धर्मावर आधारीत संघटनेच्या प्रशासनासाठी एक मॉडेल सरकार स्थापण करत आहोत. त्यांसाठी आम्ही एक हिंदू सांसद स्थापण करु इच्छितो.'
नित्यानंद याने पुढे म्हटले आहे की, संसद स्थापण करण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. आम्हाला आशा आहे की येत्या जानेवारी (2021) महिन्यापर्यंत आमचे हे कार्य पूर्ण होईल. हिंदू संसदेमध्ये पाच संस्थांचा समावेश होईल. ज्यात चित सभा, राज सभा, देव सभा, कांगा सभा आणि नित्यानंद सभा आदींचा समावेश असेल. या पाचही संस्था 'परमशिव' यांनी वेदांमध्ये आणि 'आगमशास्त्र" आदींमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतील. प्रत्येक सभेत 1,008 सदस्य असतील.
बाबा नित्यानंद याने कैलासा साठी मोफत ई-सिटीजनशिप लॉन्च केली आहे. सोबतच मोफत ई-पासपोर्टही देण्याची घोषणा केली आहे. स्वयंभू बाबा नित्यानंद याने शनिवारी रिझर्व्ह बँक ऑफ कैलासाची करन्सी जाहीर केली होती. ज्यावर गणपतीच्या चरणांची प्रतिमा कोरली आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रविवारी रात्री 7.30 वाजता नित्यानंद हे नित्यानंदा डॉट टीवीवर माहिती देणार आहेत. (हेही वाचा, भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने केली Reserve Bank of Kailasa ची स्थापना; गणेश चतुर्थीच्या दिवशी बाजारात घेऊन येणार नवे चलन)
नित्यानंद याच्यावर भारतात विविध गुन्हे दाखल आहेत. तो ऑक्टोबर 2019 मध्ये भारताबाहेर पळाल्याचे सांगण्यात येते. डिसेंबर 2019 मध्ये नित्यानंद याने घोषणा केली होती की, त्याने आपण हिंदू देश कैलास स्थापन केला आहे.