Viral Video: उत्तर प्रदेश येथील 26 वर्षीय अजीम मंसूरी (Azim Mansoori) यांनी नुकतीच एक विनंती घेऊन शामली पोलिसांकडे संपर्क साधला. अजीम यांनी पोलिसांना आपल्यासाठी नवरी शोधण्याचं आवाहन केलं. कारणं, त्यांचे कुटुंब आपल्या लग्नासाठी योग्य सहकार्य करत नसल्याचं अजीम यांनी म्हटलं आहे. अजीम यांनी पोलिसांना आपल्यासाठी नवरी शोधण्याची विनंती केली आहे. अजीम फक्त दोन फूट, तीन इंच उंच आहे. त्याच्या उंचीमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करत नाही, असं अजीमने सांगितलं आहे.
बराच शोध घेतल्यानंतरही जेव्हा त्याला योग्य वधू सापडली नाही. तेव्हा त्याने पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना त्यांचे लग्न लावून देण्याची विनंती केली. अजीमने सांगितलं की, जेव्हा जेव्हा कोणी त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी येतो, तेव्हा ते त्याला भेटून परत जातात. शामलीमध्ये एक कॉस्मेटिक शॉप चालवणाऱ्या अजीमचं म्हणणं आहे की, तो खूप पैसे कमावतो. पण तरीही त्याचे लग्न होत नाही. माझे कुटुंबीय माझं लग्न करून देण्याचा फार काही प्रयत्न करत नाहीत. म्हणूनच, सार्वजनिक सेवक म्हणून आपण पोलिसांची मदत घेण्यासाठी आलो असल्याचं अजीमने सांगितलं. (वाचा - तहानलेल्या किंग कोब्राला सर्पमित्राने बाटलीने पाजले पाणी; अचंबित करणारा व्हिडिओ व्हायरल (Watch Here))
पोलिस स्टेशन गाठल्यानंतर अजीमने महिला अधिकाऱ्याला आपली व्यथा सांगितली. तसेच आणखी किती काळ लग्नाशिवाय राहणार? असा प्रश्न विचारला. अजीमने यापूर्वी अनेक वेळा एसडीएम आणि कोतवाल यांच्याशी संपर्क साधला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी बर्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो. असं कोणी आहे का, ज्याच्याबरोबर मी माझे आयुष्य जगू शकतो? आता मी लोकसेवक पोलिसांकडे मदत मागण्यासाठी आलो आहे, असंही अजीम यावेळी म्हणाला.
सहा भावंडांपैकी सर्वात लहान असणारा अजीम म्हणाला की, शाळेत शिक्षण घेत असताना लोक त्याच्या उंचीची थट्टा करायचे. लोकांच्या गुंडागर्दीमुळे अस्वस्थ होऊन त्याने आपले शिक्षण सोडले. त्यानंतर आपल्या एका भावासोबत कॉस्मेटिक शॉपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जेव्हा तो 21 वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी एका मुलीचा शोध सुरू केला. परंतु, अजीमच्या उंचीमुळे त्याच्यासोबत कोणीही लग्न करण्यास कोणीही तयार झालं नाही.