11 Year Old Boy Hide in Fridge: 'इंडियाना जोन्स अँड द किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल' हा चित्रपट 2008 साली आला होता. या चित्रपटात हॅरिसन फोर्डने इंडियानाची भूमिका साकारली होती. यात तो रेफ्रिजरेटरमध्ये लपून आण्विक स्फोटापासून स्वत: ला वाचतो. परंतु, खरचं असं होऊ शकतं. याची कल्पना कदाचित कुणाला नसेल. मात्र, 11 वर्षाच्या मुलाने फ्रिजमध्ये बसून वादळाचा सामना केल्याची घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर सध्या या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. फिलीपिन्स (Philippines) मध्ये एक 11 वर्षांचा मुलगा दिवसभर रेफ्रिजरेटरमध्ये बंद राहिला. भूस्खलनापासून (landslide) वाचण्यासाठी या मुलाने फ्रिजचा वापर केला. जीव वाचवण्यासाठी तो तब्बल 20 तास फ्रिजमध्ये बसला होता. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, सीजे जस्मे (CJ Jasme) नावाचा मुलगा आपल्या कुटुंबासह घरी होता. दरम्यान, शुक्रवारी फिलीपिन्समधील बेबे सिटी (Baybay) मध्ये मोठ्या प्रमाणावर मातीच्या भूस्खलनामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले. (हेही वाचा - Viral Video: पती-पत्नीमध्ये झाले भांडण; पलंगावर बांधली विटांची भिंत, पहा व्हायरल व्हिडिओ)
भूस्खलनामुळे चिखल घराकडे येऊ लागल्याने 11 वर्षांचा मुलगा फ्रीजमध्ये बसला. तो 20 तास फ्रीजमध्येच राहिला. जेव्हा वादळ थांबले तेव्हा बचाव पथकाला नदीच्या काठावर एक रेफ्रिजरेटर सापडला. त्यानंतर रेस्क्यू टीमने जस्मेला त्या फ्रीजमधून बाहेर काढले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी तुटलेला फ्रीज चिखलातून शवपेटीप्रमाणे बाहेर काढला आणि नंतर 11 वर्षांच्या मुलाला तात्पुरत्या स्ट्रेचरवर ठेवले.
त्यानंतर, जेव्हा मुलाला बरे वाटले तेव्हा तो म्हणाला, 'मला भूक लागली आहे.' मीडिया रिपोर्ट्सनुसार जस्मे शुद्धीत होता. पण यादरम्यान त्याचा पाय तुटला होता. नंतर त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले.
मुलाचे कुटुंबीय अद्याप बेपत्ता -
मुलाच्या प्रकृतीची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, जस्मेचे कुटुंब भाग्यवान नव्हते. त्याची आई आणि धाकटा भाऊ अद्याप बेपत्ता आहेत. तसेच त्याचे वडिल आदल्या दिवशी भूस्खलनात मारले गेले. त्याचा 13 वर्षांचा भाऊ या आपत्तीतून वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
या वादळात बेबे शहरात सुमारे 200 लोक जखमी झाले असून सुमारे 172 लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की. वादळामुळे 200 दशलक्षाहून अधिक लोकांना परिसर सोडण्यास भाग पाडले आहे. बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी बचाव पथक अजूनही मातीचे ढिगारे उचलत आहे.