Aurangabad: युट्यूबरने केली प्रियसीची हत्या; 3 दिवस खोलीत लपवून ठेवला पीडितेचा मृतदेह
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Aurangabad: औरंगाबादमध्ये (Aurangabad) युट्युबरने (YouTuber) आपल्या प्रियसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सौरभ लाखे असे या आरोपीचे नाव आहे. विकृतीचा कळस म्हणजे या युट्यूबरने प्रियसीचा खून केल्यानंतर 3 दिवस मृतदेह खोलीत लपवून ठेवला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेमसंबंध होते. सौरभ हा वैजापूर तालुक्यातील शिरूर गावात राहतो. आरोपी एका यूट्यूब चॅनलवर काम करत असून तो विवाहित आहे. मृत तरुणी एमपीएससी-यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जालना जिल्ह्यातून औरंगाबाद येथे राहण्यासाठी आली होती. याच दरम्यान सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. (हेही वाचा -Nashik: गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने 12 वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या)

सौरभने प्रियसीची हत्या करून तीन दिवस मृतदेह खोलीत ठेवला. त्यानंतर चारचाकी घेऊन मृतदेह पोत्यात टाकला. परंतु, खोलीचा दरवाजा उघडा राहिल्याने शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास येऊ लागला. शेजाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिल्यांनंतर त्यांना जमिनीवर रक्ताच्या खुणा आढळल्या. शेजाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सकाळी खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी आला. यावेळी शेजाऱ्यांनी आरोपीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, घाबरलेल्या आरोपीने शेजाऱ्यांच्या प्रश्नांना निट उत्तरे दिली नाहीत. शेजाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने तीन-चार दिवसांपूर्वी तरुणीचा खून केला असावा. शेजारी राहणाऱ्या लोकांनी पीडित तरुणीला शेवटी 15 ऑगस्ट रोजी पाहिले होते. त्यानंतर ती खोलीत आल्याचे त्यांना आढळले नाही.

दरम्यान, आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठ घाटी रुग्णालयात पाठवला आहे. सध्या पोलीस पीडितेच्या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.