Nashik: गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने 12 वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nashik: गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या रागातून 12 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. ऋषिकेश जालिंदर सुराशे असं या मुलाचं नाव आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नैताळे पश्चिमेला असलेल्या आदिवासी वस्तीत जालिंदर सुराशे आणि पत्नी भारती सुरसे हे दोन मुलांसह राहतात. दोघेही शेतीचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मोठा मुलगा सहावी तर दुसरा मुलगा इयत्ता तिसरीत शिकतो.

आदिवासी वस्तीतील गरजू विद्यार्थी असल्याने त्याला शाळेचा गणवेश देण्यात आला. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशने व्हिडिओ गेम खेळण्यासाठी आईचा मोबाईल मागितला. ऋषिकेशची आई भारती सुराशे यांनी मुलाला मोबाईल देण्यास नकार दिला. भारती यांनी त्याला अभ्यास करण्यास सांगितले. यानंतर भारती काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या. (हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 1,500 हून अधिक लोकांचा मृत्यू: Minister Ravindra Chavan)

दरम्यान, भारती काही वेळाने घरी परत आल्या. त्यावेळी त्यांना ऋषिकेश एका खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुलांचे मोबाईलकडील आकर्षण वाढले आहे. अगदी लहान-लहान मुलांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. मोबाईलचा अतिरिक्त वापर केल्याने अनेक मुलांचे मानसिक आरोग्य बिघडल्याचे धक्कादायक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. गेम खेळण्यास मोबाईल न दिल्याने आतापर्यंत अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात ऋषिकेशच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.