
Sangli Murder Case: सांगली (Sangli) जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. शुक्रवारी रात्री कुपवाड एमआयडीसीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या नटराज कंपनीजवळ एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली. प्रेमप्रकरणातून तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने (Iron Rod) वार करण्यात आले. मृताचे नाव उमेश मच्छिंद्र पाटील असे आहे. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, मृताचा भाऊ महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली.
काय आहे नेमक प्रकरण?
प्राप्त माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे आणि अथर्व किशोर शिंदे अशी आहेत. उमेश पाटील आणि अथर्व एमआयडीसी परिसरातील एका कार्डबोर्ड कारखान्यात एकत्र काम करत होते. शुक्रवारी रात्री 9:45 च्या सुमारास नटराज कंपनीजवळ अंधाराचा फायदा घेत अथर्व आणि त्याच्या साथीदाराने प्रेमप्रकरणाच्या वादातून उमेश पाटील यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. (हेही वाचा -Pune Shocker: पुण्यात लोकप्रिय भोंदू बाबा 'प्रसाद दादा तामदार'ला अटक; पुरुषांवर लैंगिक अत्याचार, गुप्तपणे स्पाय ॲप्सद्वारे हेरगिरी, आर्थिक फसवणूकीसह अनेक गंभीर आरोप, गुन्हा दाखल)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना उमेश पाटील गंभीर अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आयुष्य हेल्पलाइन टीमच्या रुग्णवाहिकेने उमेश पाटील यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तथापी, हत्येची बातमी समजताचं मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. (हेही वाचा: Pune Coaching Class Scandal: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; दोन प्राध्यापकांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, पुणे येथील घटना)
तथापी, कुपवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई केली आणि काही तासांतच दोन्ही संशयितांना अटक केली. चौकशीनंतर दोघांनीही गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.