Bhavana Gawali, Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेतील फुटीचा धक्का पचवून रणनिती आखायला सुरुवात केली आहे. सध्या ठाकरे गटाने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर (Yavatmal–Washim Lok Sabha Constituency) लक्ष केंद्रीय केल्याचे चित्र आहे. या ठिकाणच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या आहेत. त्यामुळे भावना गवळी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतो आहे. भावना गवळी यांच्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष आहे. कारण, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे. अशा वेळी बहिणीच्या मतदीसाठी नरेंद्र मोदी प्रचाराला येणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

महाविकासआघडीचे जागावाटप अद्यापही झाले नाही. एकोप्याने लढायचे यावर महाविकासआघाडी ठाम आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करायची असेही महाविकासाघाडीचे नेते सांगत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही म्हटले आहे की, महाविकासआघाडी जागावाटप करताना प्रत्येक मतदारसंघावर चर्चा करेन. परस्पर संमतीने जागावाटप करु. पण हेच संजय राऊत पुढे म्हणतात की, लोकसभेला आम्ही 18 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यावर आमचा नैसर्गिक अधिकार आहे. त्या जागा आम्हीच लढू उर्वरीत जागांवर चर्चा केली जाईल. (हेही वाचा, BJP On Shiv Sena: 'शिवसेना खासदार गद्दार, खोकेबहाद्दर', भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपाने युतीत तणाव, एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता)

संजय राऊत यांचा दावा ध्यानात घेतला तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना (UBT) लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या मतदारसंगात फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. भावना गवळी पाठिमागील अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. सध्या त्या शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना (UBT) इच्छुक उमेदवारांची चाचपणी करत आहे. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून माजी मंत्री संजय देशमुख व पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज इच्छुक आहेत. संजय देशमुख हे माजी आमदार आहेत. ते दिग्रस विधानसभा मतदारसंघातून या आधी विजयी झाले आहेत. आणि 2002 ते 2004 या काळात मंत्रीही राहिले आहेत. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले आहेत.

दुसऱ्या बाजूला पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे शिवसेना (UBT) कडून कोणाला तिकीट मिळते याबाबत उत्सुकता आहे. सुनील महाराज यांनी म्हटले आहे की, संजय देशमुख आणि आपण दोघेही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतो आहोत. शिवसेना (UBT) कडून ज्या कोणाला तिकीट मिळेल त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करु. सुनील महाराजही राजकारणात प्रदीर्घ काळापासून सक्रीय आहेत. त्यांनीही या आधी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे पक्ष कोणावर जबाबदारी टाकतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

दरम्यान, भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे. अशा वेळी युतीच्या जागावाटपात भाजप पंतप्रधानांच्या बहिणीसाठी हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार की त्याच मतदारसंघावर दावा ठोकणार हे येणारा काळच ठरवणार आहे. शिवसेना (शिंदे गट) भाजप यांच्यात झालेल्या युतीनुसार जागावाटप झाले तर सहाजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील युतीचा प्रचार करणार. अशा वेळी पंतप्रधान भावना गवळी यांच्यासाठी एखादी सभा घेणार का याबाबतही उत्सुकात आहे.