ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

राज्य सरकारकडून श्रमिकांना आपापल्या घरी परतण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनेकजण अवैधरित्या प्रवास करत असल्याचे समजत आहे. तसेच गेल्या 2 दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे, अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab) यांनी कामगारांना दिला आहे. तसेच कामगारांनी धोकादायक प्रवास करण्याऐवजी एसटी बसमधून (ST Bus) सुरक्षित प्रवास करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्रमिकांना गेले 5 दिवसांपासून सुरक्षितपणे एसटी बसेसद्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः एसटी बसेस योग्यप्रकारे सॅनिटाराईज केलेल्या असून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले आहेत.

एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, एसटी व राज्य परिवहन विभागाने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आपल्या गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेऊन त्यांना तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देत आहेत. गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई होऊ शकते, असे अनिल परब म्हणाले आहेत. श्रमिकांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असेही आवाहन अनिल परब यांनी केले आहे. हे देखील वाचा- 'रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला' भाजपा नेते आशिष शेलार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

महाराष्ट्रात आज तब्बल 1 हजार 200 बसद्वारे 27 हजार 528 मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहचवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात गेल्या 5 दिवसांपासून 72 हजार 956 श्रमिकांना सुरक्षितरित्या त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.