अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 5,500 पदे तत्काळ भरली जाणार; महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा
Women and Child Development Minister Yashomati Thakur | (Photo Credit: Twitter)

Recruitment For Anganwadi Servant and Anganwadi Assistant: सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) सरकारचा पाळणा काहीसा लांबला होता. मात्र, आता दोन्ही मुद्दे निकाली निघाल्यावर महाविकासआघाडी सरकार जोमाने कामाला लागले आहे. या सरकारमधील विविध मत्री आपापल्या खात्याची जबाबदारी स्वीकारुन निर्णय घेऊ लागले आहेत. महिला व बालविकासमंत्री (Women and Child Development Minister) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. राज्यात अंगणवाडी सेविका ( Anganwadi Servant) व अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Assistant) या पदांसाठी 5 हजार 500 पदे तत्काळ भरण्यास मान्यता दिल्याचे मंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

माहिती आणि जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या घोषणेबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 5 हजार 500 पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली असून, प्रकल्पस्तरावर भरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

ग्रामीण भागामध्ये गाव आणि वाड्या वस्त्यांवर चालवी जाणारी माहिती केंद्रे म्हणजेच अंगणवाडी. राज्यातील विविध गावांमध्ये अंगडणवाड्या मोठ्या जोमाने कार्यरत आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. साधारण 3 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे. गावातील गर्भवती महिला, बालक, माता आदिंच्या आरोग्य, आहार, कुपोषण यांबाबत माहिती घेणे. त्याबाबत प्रशासनाला कळवणे यांसह अनेक कामे अंगणवाडीच्या माध्यमातून चालतात. ही कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस मोलाची कामगिरी बजावतात.