मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? राजकीय चर्चांना उधाण
Uddhav Thackeray And Raj Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला अधिक जागा मिळाल्या असून महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली. त्यानंतर अखेर 30 वर्ष असलेली युती तुटल्याने शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या रुपात नवे सरकार दिले. यातच आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेते पोहचले होते. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे मनापासून स्वागत केले आहे. महत्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी अनेक राजकीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. परंतु, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना शपथविधीला उपस्थित राहता न आल्याने त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियातील सदस्यांसोबत शिवतिर्थावर उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी शपथविधीला उपस्थित असणारे नेत्यांची चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न त्याठिकाणी निर्माण झाला आहे. मात्र, यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे देखील वाचा- मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह सिद्धिविनायक मंदिराचे घेतले दर्शन

महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर येत्या काही क्षणातच त्यांच्या नेतृत्वाखाली आज सह्याद्रीवर मंत्रीमंडाळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.