सोलापूर: राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला चिरडले; संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड
Water Conservation Minister Tanaji Sawant (Photo Credits: Facebook)

राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत (Water Conservation Minister Tanaji Sawant ) यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यांच्या गाडीने एका तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे.

बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे आज सकाळी (30 सप्टेंबर) ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीनं भाजी विकणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला. उपचाराला नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. श्याम असं या तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा- रत्नागिरी: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधानऊो

अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसऱ्या एका गाडीनं घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या घटनेमुळं लोकांमध्ये संताप असून सावंत यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मृत तरुणाच्या परिवाराकडून आणि या परिसरातील लोकांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर लवकरात लवकर योग्य आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.