कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे अनेकजण आपपल्या घरी परतण्यासाठी पायी चालत जाण्याचा मार्ग निवडू लागले आहेत. यातच पत्नी गरोदर असल्यामुळे एक मजूर आपल्या कुटुंबासह पुण्याहून (Pune) यवतमाळ (Yawatmal) येथे पायी जाण्यास निघाला. मात्र, ते दोघेही अहमदनगर (Ahmadnagar) येथील नेवासा तालुक्यात पोहचल्यानंतर संबंधित महिलेला प्रसुती कळा जाणवू लागली. त्यामुळे या महिलेची प्रसुती एका एटीएममध्ये (ATM) करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेची सुखरुप प्रसुती झाली असून तिला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. पहिल्यांदाच एका महिलेची एका एटीएममध्ये प्रसुती करण्याची ही पहिलीच घटना आहे.
संदिप विठ्ठल काळे आणि त्यांची पत्नी गेल्या दोन वर्षापासून पुणे येथील वाघोली येथे रोजदारीचे काम करत आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, कामधंदा नसल्याने संदिप याने आपली पत्नी, तिन वर्षाची मुलगी, बहिण आणि मेव्हणा यांच्यासह यवतमाळ येथे पायी चालत जाण्याचा पर्याय निवडला होता. याच दरम्यान नेवासा येथे आल्यानंतर महिलेला प्रसुती कळा जाणावायल्या लागल्या. महिलेला प्रसुती कळा जाणवू लागल्याने या परिस्थीत वडाळ्याचे उपसरपंच राहुल मोटे, आधार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मोटे यांनी त्यांची अडचण लक्षात घेवून तातडीने ग्रामस्थ लता उनावळेच्या मदतीने महिलेस बँक ऑफ बडोदाच्या इमारतीमध्ये आसरा दिला. येथे आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका सोनाली न्यालपेल्ली आणि वनीता काळे यांनी संबंधित महिलेची प्रसुती केली. हे देखील वाचा- महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 283 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4483 वर पोहचला- आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रशासनाने या महिलेस आणि तिच्या बाळाला पुढील उपचार घेण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या महिला आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप असल्याचे रुग्णालयाने हमी दिली आहे. तसेच या महिलेची मदत करणाऱ्या लोकांचे प्रशासनाकडून कौतूक करण्यात आले आहे. लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर कोणीही घरी परतण्यासाठी पायी किंवा इतर मार्गाचा पर्याय निवडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना सतत करत आहेत.