नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक प्रारुप मतदार याद्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
District Council Elections 2019 | Elections (Photo Credits: PTI)

विधानसभा निवडणुकीत उडालेला राजकीय धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता जिल्हा परिषदा (District Council Elections 2019) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 36 पंचायत समिती निवडणुकांचे वेध राजकीय वर्तुळाला लागेल आहेत. आगामी जिल्हापरिषद निवडणुकीसाठी नागपूर(Nagpur), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), अकोला (Akola) व वाशीम (Washim) जिल्ह्यातील प्रारुप मतदार याद्या (Voter List) येत्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांवर येत्या 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्यात येतील, अशी माहती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

आयुक्त मदान यांनी या वेळी सांगितले सांगितले की, या निवडणुकांकरिता आयोगाने दिलेल्या 31 मे 2019 च्या पत्रान्वये 10 एप्रिल 2019 या अधिसूचित दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या. परंतू नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या आद्या अद्ययावत केल्या आहेत. जुन्या याद्यांमुळे 11 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2019 या कालावधीत नोंदणी झालेले मतदार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या निवडणुकांसाठी नव्याने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नव्या कार्यक्रमानुसार 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 2 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 8 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 11 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतदानासाठी 'नवमतदार नोंदणी', मतदार यादीमध्ये Online आणि Offline माध्यमातून नाव कसं नोंदवाल?)

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही मदान यांनी दिली.