2018 मध्ये राज्यसरकारने स्थगित असलेल्या मेगाभरतीची घोषणा केली, त्यानंतर आता सरकारने ऐतिहासिक अशा शिक्षक भरतीचीही घोषणा केली आहे. तब्बल 10 वर्षानंतर राज्यात ही शिक्षक भरती होत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती करण्यात येईल, अशी घोषणा गुरुवारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. सध्या राज्यात शिक्षकांच्या सुमारे 31 हजार जागा जागा रिक्त आहेत. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी देऊन वर्ष उलटले तरीही अजून भरती झाली नसल्याने, राज्यातील तरुण वर्गाकडून प्रचंड टीका करण्यात येत होती. याबाबत विविध माध्यमांनी जोर धरल्यानंतर आता शिक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केले आहे.
राज्यात 2008 साली शेवटची शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर तब्बल 10 वर्षांनतर हा योग आला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच जानेवारीत शिक्षक भरतीबाबत प्रक्रिया सुरू होईल, असे तावडे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जानेवारीत राज्यातील रिक्त शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यातील 70 टक्के जागा या महापालिका व जिल्हा परिषद म्हणजेच स्थानिक स्वराज संस्थेतील आहेत, तर उर्वरीत जागा खासगी अनुदानित शाळांच्या आहेत. त्याबाबत रिक्त जागांबाबतची आकडेवारी आणि आरक्षणाची पदे मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. (हेही वाचा : राज्यात मेगभरती; पाहा कोणत्या पदासाठी किती जागा)
शिक्षक पदाच्या रिक्त जागा -
- पहिली ते नववीसाठी 24 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत
- नववी ते बारावीसाठी 11 हजार 589 जागा
या जागांसाठी 1 लाख 78 हजार डीएड व बीएड धारकांनी अभियोग्यता चाचणी डिसेंबर 2017 मध्ये दिली होती.