Vinayak Mete Dies In Car Accident: विनायक मेटे यांच्या कार अपघाताची कसून चौकशी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विनायक मेटे रस्ते अपघात । Twitter/ANI

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा मुंबईच्या दिशेने येताना अपघाती मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास एका ट्रकने मेटेंच्या गाडीला धडक दिल्याने त्यांच्या मेंदूला जबर धक्का बसला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर एमजीएम रूग्णालयात (MGM Hospital) त्यांना दाखल करण्यात आले पण तेथे पोहचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. विनायक मेटेंच्या अकाली निधनाच्या वृत्तावर राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मेटे आज मराठा आरक्षण प्रकरणी एका बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येत होते.

दरम्यान विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचं वृत्त समजताच तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक बड्या नेत्यांनी एमजीएम रूग्णालयामध्ये धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मीडीयाशी बोलताना विनायक मेटे यांच्या अपघाताची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मेटेंच्या कारला डाव्या बाजूने जोरदार धडक देण्यात आली आहे. त्यानंतर धडक देणारा ट्रक चालक पळून गेला आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. 8 पथकं सध्या यासाठी रवाना करण्यात आली आहेत. हे देखील नक्की वाचा: Vinayak Mete Dies In Car Accident: पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस ते रोहित पवार यांच्याकडून विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त! 

विनायक मेटे यांच्यासह त्यांच्यासोबत कार मध्ये बॉडीगार्ड आणि गाडी चालक होता. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.  विनायक मेटे यांच्यावर बीड मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आज त्यांचे पार्थिव बीडला रवाना केले जाणार आहे.

विनायक मेटे हे विधानपरिषद सदस्य होते नुकताच त्यांचा कार्यकाळ संपला होता.