Mumbai Local: मोबाईल चोरासोबत झटापट, विवाहितेचा कळवा येथे लोकलखाली मृत्यू; तीन महिन्यांच्या बाळाचे मातृछत्र हरपले
Vidya Patil, Kalwa | (Edited Image)

मोबाईल चोरासोबत झालेली झटापट एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. या घटनेत डोंबिवली येथील 35 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील कळवा (Kalwa Railway Station) ते मुंब्रा (Mumbra) स्टेशनदरम्यान घडली. विद्या पाटील (Vidya Patil) असे विवाहीत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या तीन महिन्याच्या बाळासह तीन मुलींचे मातृछत्र हरपले आहे. महिलेच्या पश्चात तीन मुली आणि पती असा परिवार आहे. दरम्यान, या सर्व प्रकारास जबादार असलेला आरोपी फैजल शेख (Faizal Shaikh) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्राथमिक तापासात पुढे आले आहे की, 31 वर्षीय फैजल शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर या आधीही गंभीर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, विद्या पाटील या एका खासगी कंपनीत अंधेरी येथे नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे शनिवारी (29 मे) सायंकाळी त्या लोकलमधील महिला डब्यातून कुर्ला लोकलने प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत इतरही काही चार पाच महिला प्रवासी होत्या. दरम्यान, त्या प्रवास करत असलेली कुर्ला लोकल कळवा स्टेशनला आली असता फैजल शेख हा चोरटा महिलांच्या डब्यात शिरला. त्याने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचला. सावध असलेल्या विद्या पाटील यांनी त्यास प्रतिकार केला. परंतू, पाटील यांच्या प्रतिकारास न जुनामनता फैजल शेख याने त्यांना जोराचा हिसका दिला. या वेळी झालेल्या झटापटीत विद्या पाटील या रेल्वेखाली ट्रॅकवर कोसळल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 7:15 वाजता कळवा रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे लोहमार्ग पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, तुमचा फोन चोरीला गेला आहे? तर अशा पद्धतीने करा 'लॉक')

दरम्यान, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी फैजल शेख याला अटकही केली आहे. फैजल हा मुंब्रा येथे राहतो, अशी माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार खडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने तातडीची कारवाई केली. या पथकाने मुंब्रा येथील बाँबे कॉलनी येथून फैजल शेख या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली.