Velhe Taluka Renamed as Rajgad: वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामांतर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

State Cabinet Meeting Decision: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे राजगड (Velhe Taluka Renamed as Rajgad) असे नामांतर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (13 फेब्रुवारी) हा निर्णय घेण्यात आला. वेल्हे तालुक्यास ऐतिहासिक परंपरांचा इतिहास आहे. हा तालुका छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. असे असले तरी तो राज्यातील अतिमागास तालुका म्हणूनही गणला जातो. या तालुक्याचे नाव बदलून त्याचे राजगड (Rajgad Taluka) असे नामांतर करावे, अशी मागणी केली जात होती. या मागणीस राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करावे ही मागणी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक पातळीवरुनही केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत: राजगड येथूनच स्वराच्याची स्थापना करण्याचे स्वप्न पाहिले आणि तशी निर्मितीही केली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी व शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या त्रिशत अमृतमहोत्सवी (375 वर्ष) वर्षात असा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करावे, असे नागरिकांची मागणी होती. मागणी आणि त्यासंबंधी आलेली असंख्य निवेदने पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. अखेर आज तो निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करुन ते प्रतिमहिना 15 इतके करण्यात आले. अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली. राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता देण्यात आली. त्यासोबतच श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्याासठी अडीच एकर भूखंड घेण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज घेण्याबाबत तसेच, राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. राज्यातील महानंदा या प्रकल्पाची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर करु शकतो. त्यामुळे अचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेणयात आले आहेत.