परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या मात्र, लसीकरणामुळे देशातच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना थेट लस (Corona Vaccination) देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर पुणे महानगरपालिकेनेही (PMC) या निर्णयाचे अनुकरणे केले आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतेच मोहोळ यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राईव्ह राबवणत असून नोंदणी न करता थेट 'वॉक इन' पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे", असेही मोहोळ म्हणाले आहेत.
“या लसीकरणासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून, सकाळी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर हा ड्राईव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करु नये", असे आवाहन मोहोळ यांनी केले आहे. हे देखील वाचा- चंद्रपूर मधील दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; जयंत पाटील यांचा जूना व्हिडिओ शेअर करत विचारला जाब
मुरलीधर मोहोळ यांचे ट्वीट-
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण 'ड्राईव्ह' !
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 29, 2021
तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असेही मोहोळ म्हणाले आहेत.