हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना होणार नाही; नितीन गडकरींची जीभ घसरली
Union Minister Nitin Gadkari | (Photo Credits: PTI)

सिंचनावर बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जीभ घसरली. टेंभू सिंचन योजनेविषयी बोलत असताना गडकरींनी वादग्रस्त विधान केले. हिजड्याशी लग्न केल्यास त्याला मुले होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असे गडकरी म्हणाले. सांगली येथील शेतकरी मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.

टेंभू सिंचन योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. मात्र भाजपाच्या काळात ही योजना पूर्ण झाली. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्याचबरोबर टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपाच्या काळात पूर्ण झाल्या, असेही गडकरींनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. धनगर आरक्षणासाठी जेव्हा बारामतीत आंदोलन सुरु होते तेव्हा एकही बारामतीकर नेता त्यांच्या भेटीला आला नव्हता. मात्र तेच आता पोपटासारखे बडबड करत आहेत. दोन समाजांमध्ये भांडणे लावत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

मराठा आरक्षणाप्रमाणेच धनगर समाजालाही आरक्षण मिळेल. तसंच मराठा आरक्षणावरुन ओबीसी समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू न देण्याचा शब्द यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.