Uddhav Thackeray Reply To Devendra Fadnavis: ती बाळासाहेबांची खोली, अमित शाहांनी तिथे तुम्हाला 'नो एन्ट्री' केली होती; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणताय ती बाळासाहेबांची खोली आमच्यासाठी मंदिर आहे असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलं. 'मातोश्री'मध्ये नाक रगडत आलेले अमित शाहांनी त्यावेळी त्याच खोलीत तुम्हाला नो एन्ट्री केली होती अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरेंना वेड लागलं असून अमित शाहांनी त्यांना कुठल्यातरी खोलीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावा करतात अशी टीका फडणवीसांनी केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस असल्याचे म्हटले.  (हेही वाचा - Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल)

बाळासाहेबांची खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एन्ट्री केली होती, तू बाहेर बस असं अमित शाहांनी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते, गोपीनाथ मुंडे आले होते, प्रमोद महाजन आले होते. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तिला तू नालायक माणसा, कुठलीतरी खोली म्हणतोय. कधी कुठे जाताना, चांगलं काम करताना आम्ही त्या खोलीत जाऊन बाळासाहेब, माँसाहेबांसमोर नतमस्तक होतो असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की आदित्यला ग्रुम करतो, अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो. मी म्हणालो, तो वयाने लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. आमदार म्हणून त्याला काम करू द्या. आणि समजा आदित्यला मुख्यमंत्री केलात तर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार का? त्यावर आपण दिल्लीला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आपल्याला अर्थव्यवस्थेमधील कळतं असंही ते म्हणाले होते.