Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल
Ajit Pawar | (Photo Credit - Facebook)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी भलेही संस्थापक अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्यावर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंड केले असेल. निवडणूक आयोगाच्या कृपेने तात्पूरते का होईना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह घड्याळ त्यांना मिळाले असेल. पण, असे असले तरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षातही सर्वच काही अलबेल नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याबद्दलच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा (Lok Sabha Constituency) मतदारसंघावरील हक्क सोडल्यावरुन ही नारजी असल्याचे समजते. छगन भुजबळ यांनी या जागेवरुन आपण माघार घेत असल्याचे जारीर केल्यापासून ही चर्चा अधिकच वाढली आहे.

महत्त्वाच्या जागांवर पाणी

अजित पवार यांनी भाजप आणि महायुतीतल मित्रपक्षांच्या दबावाला बळी पडून तगडे उमेदवार असताना आणि विजयाची खात्री असलेले मतदारसंघ सोडून दिले आहेत. या धोरणाचा पक्षाच्या वाढीवर आणि संघटनेवर पर्यायाने एकूण सत्ताकेंद्रावरच परिणाम होण्याची शक्यता आहे. खास करुन नाशिक, परभणी, गडचिरोली, सातारा या महत्त्वाच्या जागांवर पाणी सोडल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: 'निधी पाहिजे तर कचाकचा बटणं दाबा' वादग्रस्त विधानावर पहा अजित पवार यांनी दिलेलं स्पष्टीकरण)

राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांसाठी पाणी सोडलेले मतदारसंघ

नाराजीचे नेमके कारण काय?

अजित पवार यांच्यावर पक्षांतर्ग नाराजीचे महत्त्वाचे कारण म्हणजे महायुतीच्या जागावाटपात मिळालेल्या आणि पूर्वंपार हक्काच्या मतदारसंघामध्ये बाहेरुन उमेदवार आयात करणे. तसेच, हक्काचे मतदारसंघ जागावाटपामध्ये मित्रपक्षांना सोडणे. याशिवाय ज्या मतदारसंगामध्ये जोखीम अधिक आहे ते मतदारसंघ आपल्याकडे घेणे, या सर्व बाबींमुळे ही नाराजी अधिक असल्याचे समजते. (हेही वाचा, Ajit Pawar NCP Symbol Statement Released: कोर्टाचा दणका, अजित पवार यांच्या पक्षाकडून 'घड्याळ' चिन्हाबाबत प्रसारमाध्यमांतून निवेदन प्रसिद्ध)

छगन भुजबळ यांची माघार

नाशिक, सातारा आणि तत्सम लोकसभा निवडणूक मतदारसंघांमध्ये उमेदवारी जारीर करायला कारणाशिवाय विलंब लावल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या महाविकासआघाडीने आपापले उमेदवार जाहीर केले आणि त्यांनी प्रचारही सुरु केला. या उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल तीन आठवड्यांहून अधिकचा काळ मिळाला. असे असाताना आणखी संभ्रम नको आणि वेळही वाढायला नको असे कारण देत पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भूजबळ यांनी उमेदवारीतूनच माघार घेतली. परिणामी आता हा मतदारसंघ कोणाला जाणार याबाबत प्रश्न निर्माण झाला.

साताऱ्यातून घड्याळ हद्दपार

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात तर उमेदवारीच घेतली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून इतक्या वर्षांच्या इतिहासात प्रथमच या मतदारसंघातून घड्याळ हद्दपार करण्यात आले. ही बाब जमीनिवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनाला अधिक लागल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.