Uddhav Thackeray, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे ठाण्यात, शिंदे गट समर्थकांच्या मारहाणीत जखमी रोशनी शिंदे यांची घेतली भेट
Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाणे येथे दाखळ झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठाणे (Thane) येथे आल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाेच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. रोशनी शिंदे यांच्यावर एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (3 एप्रिल) हल्ला केला. या हल्ल्यात रोशनी शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर ठाण्यातील राजकारण जोरदार तापले आहे.

रोशनी शिंदे यांना झालेली मारहाण गंभीर स्वरुपाची आहे. त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यात एकाधिकारशाही सुरु असल्याची टीका केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहविभागावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. ठाण्यात आणि महाराष्ट्रामध्ये जो हल्ला आणि हिंसाचार सुरु आहे हा सर्व हिंसाचार राज्य सरकार पुरस्कृत आहे. गृहमंत्र्यांचा त्यांच्या खात्यावर वचक नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दबावाखाली काम करत आहेत. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. त्यांच्या वरदहस्तामुळेच ठाण्यात हिंसाचार होत असल्याची टीका केली. (हेही वाचा, Maharashtra Politics: संजय शिरसाट यांच्याविरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; सुषमा अंधारे यांची माहिती)

दरम्यान, चौफेर टीका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे आपल्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच, रोशनी शिंदे या वारंवार मुख्यमंत्री शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार विरोधात आणि आक्षेपार्ह भाषेत पोस्ट टाकत होत्या. त्यामुळे आपला संयम संपला आणि आम्ही त्यांना समजावले. त्यांना मारहाण झाल्याचे जे सांगतिले जात आहे तसे काही घडलेच नाही, असे सांगितले.