अतुल सावे । Twitter

बाबरी मशिद तोडताना शिवसैनिक अयोद्धेत नव्हते असा दावा करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना शिताफीने कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक मोरेश्वर सावे अयोद्धेत गेले होते आणि याची शहानिशा भाजपाने त्यांच्याकडे असलेल्या सावेंचा लेक अतुल सावे यांच्याकडे करा असं आव्हान काल औरंगाबादच्या जाहीर सभेत दिलं होतं. दरम्यान आज सावे मीडीयासमोर आले होते तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या या आव्हानावरून शिवसेनेवर पलटवार केला आहे. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे अयोद्धेला कार सेवक म्हणून गेले होते पण महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी मांडलेल्या प्रखर हिंदुत्त्ववादी विचारांमुळे शिवसेनेने त्यांचे खच्चीकरण केले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान एक कारसेवक म्हणून अयोद्धेला शिवसेनेसोबत भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे देखील कार्यकर्ते होते. संभाजीनगर वरून एक ट्रेन भरुन असे कारसेवक गेले होते. पण मोरेश्वर सावे जेव्हा महाराष्ट्रात परतले तेव्हा त्यांनी मांडलेल्या प्रखर हिंदुत्त्ववादी विचारांवरून त्यांचे खच्चीकरण केले. उद्धव ठाकरेंनी औरंगाबदच्या सभेत केवळ एकच बाजू सांगितली पण  शिवसेनेने मोरेश्वर सावेंना शिवसेनेने लोकसभेचं तिकीट दिले नाही. मोरेश्वर सावेंना सामान्यांनी दिलेल्या 'धर्मवीर' पदवीचा स्वीकार का केला नाही? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अतुल सावे हे भाजपाचे आमदार आहेत. आज ते विधानपरिषदेसाठी उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांचा अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी मीडीयाशी बोलताना काल औरंगाबादेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोरेश्वर सावे 1989-96 दरम्यान शिवसेनेचे औरंगाबादचे दोन वेळेस खासदार होते सोबतच त्यांनी औरंगाबादेत महापौर पद ही भूषवले होते. 2015 साली त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता.

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेमध्ये काल भाजपा वर टीका केली आहे. 'हिंदुत्ता'वरून शिवसेनेवर होणार्‍या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण मुद्द्यावरून त्यांनी केंद्राला सवाल विचारला आहे तसेच नामांतर शिवसेनेकडून होईलच पण त्यासोबतच नावाला शोभेल असं शहर देखील घडवलं जाईल असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.