Udayanraje Bhosale: सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाचा? उदयनराजे भोसले यांचे सूचक विधान, उमेदवारीबद्दल भाजपचे मौन
Udayan Raje Bhosle (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी महाराष्ट्रात पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली काही विद्यमानांचे तिकीट कापले. दरम्यान, अजूनही काही मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघात काय होणार? भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या आणि विद्यामान राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. परिणामी भाजप त्यांना तिकीट देणार की ऐनवेळी भूमिका बदलली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

उदयनराजे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी

भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यावर दस्तूरखुद्द उदयनराजे यांनाच प्रसारमाध्यमांनी विचारले असता, माझ्याकडे वेगवेगळी तिकीटे आहेत. माझ्याकडे बसचे, विमानाचे आणि रेल्वेचेही तिकीट आहे. पिक्चरचंही तिकीट आहे पण इतर तिकिटांचे काही आपल्याला माहिती नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे राजेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. इतकेच नव्हे तर काही अयोग्य निर्णय झाला तर आम्ही एकमताने निर्णय घेऊ, असेही राजे समर्थकांनी म्हटले आहे. त्यामुळे सातारच्या राजकारणात मोठ्या वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Election Dates: लोकसभा निवडणूक कार्यक्रम आज होणार जाहीर; जाणून घ्या ECI कधी घेणार पत्रकार परिषद)

मी सन्यास घेतला नाही

उदयनराजे यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, महायुतीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत. खास करुन तीन पक्ष महत्तवाचे आहेत. अशा वेळी आपल्या उमेदवाराला तिकीट मिळावे असे कोणत्याही पक्षाला वाटणे स्वाभावीक आहे. त्यात काही चूक नाही. त्यामळे प्रत्येकाला वाटते मलाच तिकीट मिळावे. ते रास्त आहे. मात्र, हे सर्व खरे असले तरी आपण सन्यास घेणार नसल्याचे सांगत महाराजांनी सूचक वक्तव्य केले आणि आपणही तिकीटाच्या स्पर्धेतील महत्त्वाचा घटक आहोत, असे स्पष्ट संकेत दिले. (हेही वाचा, Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार? या कालावधीत कोणते निर्बंध असतील? जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपप्रमाणेच अजित पवार गटानेही दावा सांगितला आहे. या ठिकाणी अजित पवार हे रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास इच्छु आहेत. स्वत: रामराजे यांनाही या उमेदवारीत ऋची आहे. दुसऱ्या बाजूला भाजपही ही जागा लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आहे. इतकेच नव्हे तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सातारा दौरा नुकताच झाला. या दौऱ्यातही त्यांनी राजेंच्या उमेदवारीबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे राजे गटामध्ये अस्वस्थता आहे. राजेंचा पत्ता कट होणारअशीही दबक्या आवाजात चर्चा असल्याने राजे गट आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.