पुण्यात (Pune) टॅंकरने एका दुचाकीला धडक दिल्याने (Road Accident) एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली आहे. मृत मुलगी आपल्या आईसह तिच्या मामाला भेटण्यासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी टॅंकर चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडून (Bundgarden Police Station) अधिक तपास करण्यात येत आहे.
श्री दत्तात्रय थोरात असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकलीचे असून ती कोंढवा येथे राहायला होती. श्री ही तिची आई मनीषा दत्तात्रय थोरात (वय, 38) यांच्यासोबत तिच्या मामाला भेटण्यासाठी मोपेडवरून दुपारच्या सुमारास चाकणकडे जाण्यास निघाल्या होत्या. दरम्यान, मनीषा या दुचाकी चालवत असून श्री त्यांच्या मागे बसली होती. परंतु, मनीषा यांची दुचाकी पुणे स्टेशन जवळ असलेल्या आरटीओ ऑफिस समोरील पेट्रोल पंपापासून संगमवाडीकडे जात होती. त्याचवेळी पाठी मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ज्यात मनीषा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर, श्रीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Thane: बबली गँगच्या दोन्ही तरुणींना अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश; 'अशा' पद्धतीने लुटायचे ज्वेलर्सचे दुकान
या प्रकरणी टँकर चालक राम बाबू खाडे याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास करण्यात येत असल्याचे बंडगार्डन पोलिसकडून सांगण्यात आले. मात्र, या अपघातात सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने थोरात कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. तसेच याप्रकरणातील दोषींला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.