Thane: बबली गँगच्या दोन्ही तरुणींना अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश; 'अशा' पद्धतीने लुटायचे ज्वेलर्सचे दुकान
Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बबली गॅंगच्या (Babli Gang) दोन्ही तरूणींना अटक करण्यात नौपाडा पोलिसांना (Naupada Police) यश आले आहे. या कामगिरीनंतर ठाणे पोलिसांच्या नौपाडा पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. बबली गॅंगच्या या दोन्ही महिलांचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघीजणी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्याच्या बहाणे हातामध्ये घालून बघतात. त्यानंतर काऊंटरवरील सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवून सोन्याच्या बांगड्या चोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आयुषी गुलाब शर्मा (वय, 26) आणि संजू रविंद्र गुप्ता (वय, 34) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांचे नाव आहेत.आयुषी ही मॉडेलचे काम करते, तर संजू रविंद्र गुप्ता ही विवाहित असून गृहिणी आहे. या दोघीजणी 7 ते 8 दिवसापूर्वीच मीरा रोड येथे राजाराम शर्मा या नातेवाईकाकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आल्या होत्या. या दोघीजणी ठाण्यातील गोखले रोड येथील रिचेस ज्वेलर्स आर्केड दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आत शिरल्या. दुकानात गेल्यानंतर दोन्ही तरूणींनी 20-25 बांगड्या पाहिल्या. त्यानंतर पसंत नसल्याचे सांगत त्या दोघेही दुकानातून निघून गेल्या. परंतु, त्या दुकानातील सेल्समेनने बांगड्या उचलून ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यात 2 सोन्याच्या बांगड्या कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत ज्वेलर्स मालकाने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या दोन्ही महिलांनी अगदी चलाखीने ज्वेलर्स दुकानातील 2 बांगड्या चोरल्याचे स्पष्ट झाले. हे देखील वाचा- Who is Sachin Vaze? अंबानी स्फोटक प्रकरणात चर्चेत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे नेमके कोण? वाचा सविस्तर

याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेल्या सोन्याच्या बांगडया हस्तगत केल्या. त्या व्यतिरिक्त ओशिवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या 33 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या असा एकूण 4 लाख 92 हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. महत्वाचे म्हणजे, 2 महिन्यांपूर्वी या दोघींना कोल्हापूर येथे अशाच सोन्याच्या चोरी प्रकरणी अटक झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे.