Sachin Vaze (Photo Credits: Facebook)

रिलायन्स ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार गेल्या काही दिवसांपूर्वी सापडली होती. या गाडीचा मालक मनसुख हिरेन ने आज आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं आणि संशयास्पद असून लवकरच याच्या संपूर्ण तपासाची जबाबदारी तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे यात त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तर कोण आहेत हे सचिन वाझे जाणून घेऊया त्यांच्याविषयी अधिक.... (देवेंद्र फडणवीस यांनी काय आरोप केले जाणून घ्या)

सचिन हिंदुराव वाझे असे त्यांचे पूर्ण नाव असून ते मुळचे कोल्हापूरचे आहेत. 22 फेब्रवारी 1972 रोजी त्यांचा जन्म झाला. 1990 मध्ये ते पोलिस दलात भरती झाले. नक्षल भागात पहिली पोस्टिंग मिळाल्यानंतर 1992 मध्ये त्यांची ठाण्यात बदली झाली. (Mukesh Ambani यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांची आत्महत्या; मुंब्रा येथील खाडीत सापडला मृतदेह)

# एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी सचिन वाझे यांची ओळख आहे.

# गेल्यावर्षी तब्बल 16 वर्षांनी ते पोलिस दलात परतले.

# सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत.

# मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात वाझे यांचेही नाव होते. त्यामुळे त्यांना 2004 साली निलंबित करण्यात आले होते.

# 2007 मध्ये त्यांनी राजिनामा दिला होता. मात्र या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता.

# 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

# सायबर क्राईम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत.

# गरजू लोकांना कायदेशीर मदत देणाऱ्या एका एनजीओसाठी त्यांनी एक अॅपही तयार केले आहे.

# सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले आहे. तर शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.

सचिन वाझे ठाण्यात राहत असून अंबानी स्फोटक प्रकरणातील चोरीची गाडी देखील ठाण्यातील होती. यामुळे वाझेवर संशय व्यक्त केला जात आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होते. मात्र दोन दिवसापूर्वीच या प्रकरणाची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलण्याची कारवाई देखील सचिन वाझे यांच्या पथकाने केली होती.