मुंबई ते नागपूर सुसाट प्रवास करण्यासाठी आणि राज्याच्या विकासाचं ध्येय समोर ठेवून समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आला. मात्र या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका पाहता आता अनेकांनी त्यावरून प्रवास करण्याचा धसका घेतला आहे. सातत्याने होणार्या अपघातामुळे हा महामार्ग अधिक चर्चेमध्ये आहे. त्यामुळे अपघातांच्या पार्श्वभूमीवर समृद्धीवर तूर्तास वाहतूक स्थगित करावी अशी याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरलार आणि MSRDC ला नोटीस बजावत 4 आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग टप्प्या टप्प्याने नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. हा मार्ग खुला झाल्यापासूनच त्यावर सातत्याने लहान मोठे अपघात सुरू आहेत. त्यामुळे वाहतूकीला सुरूवात करण्यापूर्वी या महामार्गावर सुरक्षेच्या निगडीत समस्या दूर कराव्यात. त्यासाठी सुसज्ज उपाययोजना कराव्यात असं या याचिकेतून सांगितलं आहे. अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठामध्ये याबाबतची याचिका दाखल केली आहे.
दरम्यान न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
नागपूर ते मुंबई अशा 701 किलोमीटरच्या महामार्गावर हजारो अपघात झाले आहेत. टायर फुटण्यापासून ते तांत्रिक चूका, चालकाला डुलकी लागल्याच्या अनेक कारणांमुळे अपघात झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका ट्रॅव्हल्स ची बस उलटून आग लागल्याने 25-30 जणांनी जीव गमावले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावर चालकांना सूचना देण्यासाठी विशिष्ट सिस्टम बसवली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर काही दिवसांपूर्वी महामार्गावर रील्स बनवणार्यांना थेट जेलवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.