Mumbai Auto-Taxi Fare: मुंबईत 1 ऑक्टोबरपासून ऑटो आणि टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे. एका अधिकाऱ्यांने सांगितले की, मुंबई आणि महानगर प्रदेशातील रहिवाशांना काळ्या आणि पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी किमान भाडे 28 रुपये आणि ऑटो रिक्षासाठी 23 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत टॅक्सी-ऑटोच्या भाड्यात अनुक्रमे 3 आणि 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन भाडे 1 ऑक्टोबरपासून लागू होईल.
मुंबई शहरात काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे किमान भाडे 1.5 किमी अंतरासाठी 25 रुपयांवरून 28 रुपये आणि ऑटो-रिक्षांसाठी 21 रुपयांवरून 23 रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच आता टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 16.93 रुपये ऐवजी 18.66 रुपये प्रति किमी आणि ऑटो-रिक्षासाठी प्रति किमी 14.20 ऐवजी 15.33 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ऑटो-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा -Rain Update: महाराष्ट्रात यंदा तीन महिन्यात 123 टक्के पाऊस तर नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद)
सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींच्या भाड्यातही वाढ -
यापूर्वी, मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे 60,000 टॅक्सी आणि सुमारे 4.6 लाख ऑटो-रिक्षांचे भाडे 1 मार्च 2021 रोजी सुधारित करण्यात आले होते. त्याचवेळी पुन्हा एकदा भाडेवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल तसेच सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींसाठी नवीन दर लागू होतील, असे एमएमआरटीएने म्हटले आहे.
दरम्यान, शहरात चालणाऱ्या ब्लू-सिल्व्हर 'कूल' कॅब टॅक्सींचे भाडेही वाढवण्यात आले आहे. या कॅबचे किमान अंतर भाडे 33 रुपये प्रति किमीवरून 40 रुपये प्रति किमी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील ऑटो-टॅक्सी युनियन भाडेवाढीची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनांनी दिला होता. मात्र आता ऑटो-टॅक्सी युनियनच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने प्रस्तावित बेमुदत संपही मागे घेण्यात आला आहे.